सोलापूर : आषाढी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदी स्नान व श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन तृप्त झालेले लाखो भाविक, वारकरी जड अंतकरणाने परतीच्या प्रवासाला निघाल्याचे चित्र पंढरपुरात सर्वत्र दिसत आहे. 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता' अशी भावना व्यक्त करीत लाखो भाविकांनी बस स्थानक, रेल्वे स्थानकासह परतीच्या मार्गांवर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी यात्रेला राज्याच्या विविध भागातून १२ लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. गुरुवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली होती. आषाढीच्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दर्शन रांगेत उभे होते. शिवाय चंद्रभागेच्या नदीत स्नान करण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक आता परतीच्या मार्गावर लागले आहेत. भाविकांची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळ व रेल्वे प्रशासनाने ज्यादा गाड्यांचे नियोजन केले आहे. खासगी गाड्यातून आलेल्या भाविकांची संख्या जास्त असल्याने सध्या परतीच्या मार्गावर शेकडो गाड्या दिसत आहेत.