पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीमुळे महाविकास आघाडीला होणारा फायदा लक्षात घेता एकास एक उमेदवार देऊन राष्ट्रवादीची हक्काची जागा खेचून आणत महाविकास आघाडीला धक्का देण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. भविष्यात महाविकास आघाडीला राज्यात शह देण्यासाठी पंढरपूर पॅटर्न राज्यभर राबविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार समाधान आवताडे यांचे अभिनंदन केले. त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्ह्यातील इतर नेत्यांचे कौतुक करत भविष्यात येणाऱ्या निवडणुका अशाच एकीने लढविण्याच्या सूचना दिल्या. राज्यभर गाजलेली पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक भाजपने चाणक्य रणनीतीचा अवलंब करत तिरंगी लढतीमुळे महाविकास आघाडीला होणारा फायदा लक्षात घेऊन व्यूव्हरचना आखली. भाजपच्या दोन तगड्या उमेदवारांमध्ये मनोमिलन घडवत एकास एक उमेदवार देत मतविभागणीचा फायदा टाळला आणि अशक्यप्राय वाटणारी ही निवडणूक जिंकत सत्ताधारी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात असूनही भाजपचे मनोबल कमालीचे उंचावले आहे.
राज्यात या तिघांना शह देण्याचा नवा फॉर्म्युला भाजपला मिळाला आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राम सातपुते, विजयराज डोंगरे, जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आदी नेत्यांनी एकीने निवडणूक लढवत विजय खेचून आणल्याबद्दल त्यांचे देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले.
भविष्यात राज्यात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये पंढरपूर पॅटर्न राबवत मत विभागणी टाळण्यासाठी भाजपच्या गटा-तटामध्ये मनोमिलन घडवत एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करून महाविकास आघाडीला नक्की हारवू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय सोलापूर जिल्ह्यातील येणाऱ्या निवडणुकीमध्येही पंढरपूर पोटनिवडणुकीप्रमाणे एकीचे दर्शन घडवू व अशक्यप्राय वाटणाऱ्या जागा नक्की खेचून आणू, असा सल्लाही त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिला आहे.
या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्य पातळीवरील भाजपच्या नेत्यांचे मनोबल उंचावले असून सोलापूर जिल्ह्यातील विविध अपूर्ण योजना, मंगळवेढ्याचे ३५ गावचे पाणी, सध्या वाढत असलेला कोरोना, सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी इंदापूरला नेण्याचा जो घाट घातला आहे, याबाबत आपण लक्ष घालून त्या त्या जिल्ह्याचे पाणी तेथील हक्काच्या शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, याबाबत आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना दिला आहे.