पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणार्या तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुन्हा बंद पडल्या असून, भीमा नदी पात्रातील पाणी बंधार्यात अडविल्याने दूषित बनले आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तालुक्यातील १०५ गावांची पिण्याच्या पाण्याची भिस्त हातपंप, खाजगी विंधन विहिरी व ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांवरच राहणार आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींतर्फे कारभार चालविल्या जाणार्या १०५ गावांना भीमा नदी, माण नदी हे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत असून उजनी व नीरा उजवा कालव्यांच्या फाट्यांबरोबरच सोनके तलावातूनही तालुक्यातील काही गावांची तहान भागविली जाते. भीमा नदीवर तालुक्यातील आवे, पटवर्धन कुरोली, गुरसाळे, मुंढेवाडी, पुळूज आदी ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविण्यात आल्याने हे पाणी पिण्यायोग्य रहात नाही. तर नदीकाठच्या बहुतेक गावांतील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना देखरेखीअभावी बंद पडल्याने या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एकतर हातपंप, खाजगी विंधन विहिरी अथवा खाजगी विहिरींचा आधार घ्यावा लागतो. तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना सोनके तलावातूनही पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणार्या भाळवणी, खर्डी, कासेगाव या तिन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टंचाई आराखड्यातून तात्पुरत्या निधीची तरतूद करून चालविण्यात आल्या होत्या. मात्र यंदा या योजना पुन्हा बंद पडल्याने या योजनेतील गावांवर पाणीटंचाईची कुºहाड कोसळणार आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मंजुरीसाठी शासनाने १० टक्के लोकवर्गणी व ९० टक्के निर्मलग्रामची अट घातल्याने नवीन योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायती धजावत नाहीत. या जाचक अटींमुळे काही गावच्या पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत.
-------------------------------
दृष्टिक्षेप तालुका ४ एकूण गावे - १०५ (९४ ग्रामपंचायती) ४ लोकसंख्या - ३ लाख ४३ हजार ४४५ ४ टॅँकरची मागणी - ८ (सध्या एकही टॅँकर चालू नाही) ४ तहानलेली गावे-१२ (बार्डी, करकंब, सिद्धेवाडी, खर्डी, भटुंबरे-विसावा, वाखरी, तुंगत, नारायण-चिंचोली, खरातवाडी, सोनके, कासेगाव, तारापूर) ४ एकूण हातपंप - १५५८ ४ अधिगृहीत खाजगी विहिरी/विंधन विहिरी - ८ ४ नवीन विंधन विहिरी - १० ४ पाण्याचे स्त्रोत- भीमा नदी, माण नदी, उजनी व नीरा उजवा कालवा, विहिरी, विंधन विहिरी, सोनके तलाव.
------------------------------
टंचाईग्रस्त आराखडा योजनेतून १० ठिकाणी हातपंप सुचविण्यात आले होते. मात्र भूजल सर्वेक्षण खात्याने ४ ठिकाणी शिफारस केल्याने ४ प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आले आहेत. पाणीटंचाई कालावधीत मागणीनुसार टॅँकर देण्याची तरतूद करण्यात येईल. - एम. एन. सरवदे उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा