प्रभू पुजारी पंढरपूर : शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास़... १७ दिवस पालखी सोहळे अन् दिंड्यांसोबत़... ऊन, वारा, पाऊस, कधी चिखल तर खड्डेमय रस्त्याचा खडतर मार्ग़... पांडुरंगाच्या पंढरीत दाखल झाल्यानंतर पुन्हा १० किलोमीटरपर्यंत दर्शन रांगेत उभे राहायचे... तब्बल २२ ते २५ तास दर्शन रांगेत उभारून केवळ एकच सेकंद पांडुरंगाचे दर्शन झाले अन् जीवनातील परमोच्च आनंद झाला़ आनंद गगनात मावेनासा झाला, चेहºयावर हास्य फुलले़ बघा! किती खस्ता खाल्ल्या पण अखेर पांडुरंगाचं दर्शन झालंच, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत दर्शन घेऊन पश्चिमद्वारातून बाहेर आलेल्या भाविकांनी़
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहूहून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने वाटचाल करतो़ शिवाय अन्य संतांचेही पालखी सोहळे पंढरीत येतात़ या सर्व पालखी सोहळ्यांसह दिंडीतून लाखोंच्या संख्येने भाविक मजल-दरमजल करीत पंढरीत दाखल होतात़ शनिवारी बाजीराव विहिरीवरील रिंगण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे वाखरी येथे मुक्कामी विसावले; मात्र या पालखी सोहळ्यासोबत आलेले भाविक पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत येऊन चंद्रभागेत पवित्र स्नान करून दर्शन रांगेत उभारले़ २० तास, २२ तास, २५ तासानंतर केवळ एक सेकंद पांडुरंगाचे दर्शन झाले़ अशा काही भाविकांच्या पश्चिमद्वार येथे प्रतिक्रिया घेतल्या़
वर्धा येथील वेणुताई गावंडे म्हणाल्या, शनिवारी दुपारी २ वाजता गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांगेत उभी राहिली़ संपूर्ण रात्र दर्शन रांगेतच काढली. रविवारी दुपारी १२़२० मिनिटांनी पांडुरंगाचे दर्शन झाले़ म्हणजेच एक सेकंदाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी तब्बल २२ तास २० मिनिट दर्शन रांगेत होते; मात्र दर्शनानंतर खूपच आनंद झाला़ मी गेल्या ११ वर्षांपासून वारी करते़ वारीसारखा आनंद जगाच्या पातळीवर कोठेही मिळत नाही़ त्यामुळे कितीही वर्षे झाली तर पुन्हा पुन्हा वारीत सहभागी होण्यासाठी आषाढी यात्रा सोहळा केव्हा येतोय, याची उत्सुकता लागलेली असते़ त्यांच्यासोबत नागपूर येथील सीमा नारेकर याही होत्या़ त्यांची ही दुसरी वारी आहे़ पांडुरंगाच्या दर्शनानंतर जीवनात सर्व काही मिळाल्याचा आनंद झाला़ भालेगाव (ता़ घनसावंगी, जि़ जालना) येथील शहादेव उडाण म्हणाले, शनिवारी दुपारी ४ वाजता गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांगेत उभा राहिलो़ रात्रभर दर्शन रांगेतच उभा होतो़ कितीही त्रास झाला तरी चालेल पण पांडुरंगाचे दर्शन झाले की, सर्व काही विसरून जातो़ एक प्रकारची ऊर्जा मिळते़ आनंद अन् उत्साहाने मन भरून येते़ त्यामुळेच की काय गेल्या ३१ वर्षांपासून वारीत सहभागी होतो़ त्यांच्यासोबत निपाणी (ता़ देवराई) येथील गोवर्धन काकडे हे होते़
त्रास झाला, पण पुन्हा वारीत यावे वाटतंय!- उमापूर (ता़ देवराई, जि़ बीड) येथील दिगंबर पिंगळे, संभाजी चेडे, राजेंद्र चेडे, अजय चेडे हे चार तरुण एकत्र येऊन शनिवारी रात्री ८ वाजता दर्शन रांगेत गोपाळपूरच्या पुढे उभे राहिले होते़ अख्खी रात्र दर्शनरांगेत काढली़ अखेर रविवारी दुपारी १२़४० वाजता पांडुरंगाचे दर्शन झाले़ १६ तास ४० मिनिटे रांगेत उभे होतो़ त्यातील दिगंबर पिंगळे म्हणाला, आम्ही प्रथमच वारीसाठी आलोत़ आम्हाला त्रास खूपच झाला, पण दर्शनानंतर तितकाच आनंद झाला हेही तितकेच खरे! कितीही त्रास होत असला तरी पुन्हा वारीत सहभागी होण्याची इच्छा होते़ इतरवेळी कितीही त्रास झाला तर तो विषय सोडून देतो, पण काय माहीत? त्रास होऊन ही पुन्हा वारीत सहभागी व्हावेसे वाटते, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली़