माळशिरस - मुखी हरिनामाचा जयघोष करत पांडुरंगाच्या दर्शनाची आस लावून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. महाराष्ट्राला हजारो वर्षांची वारकरी परंपरा आहे. संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराज पालखींसोबत राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. ऊन, पावसाची पर्वा न करता वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. त्यात काही वारकऱ्यांना आरोग्याचा त्रास होतो तेव्हा मुंबईची 'माऊली' वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पुढे सरसावते.
वारी दिंडीच्या पालखी मार्गावर अनेक संस्था वारकऱ्यांची सेवा करतात. त्यातील एक म्हणजे मुंबईतील माऊली चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट. मागील ३१ वर्षापासून ही संस्था वारीत वैद्यकीय सेवा आणि औषधे मोफत पुरवत असते. ज्यामुळे वारकरी संप्रदायाने यासेवेला डॉक्टर दिंडी असं नाव दिलंय. वारीच्या सुरवातीलाच तज्ञ डॉक्टर आणि अनुभवी मेडिकल स्टाफ यांच्या उपस्थितीत भव्य असं मेडिकल कॅम्प आळंदी ते पंढरपूर येथील वारीच्या मार्गावर २२ ठिकाणी उभारले जातात. ज्यामध्ये मुंबई सह महाराष्ट्र आणि देशभरातील नामांकित असे ५०० पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत असतात.
नैसर्गिक वातावरणामुळे वारकऱ्यांना पायी दिंडी सोहळ्यातून चालताना होणारे आजार, ताप, पाय दुखणे, कधी अपघात घडल्यास तातडीने छोटी शस्त्रक्रिया, श्वसनाचे आजार, हृदय रोग, नेत्र चिकित्सा अशा प्रकारे तातडीने माऊली ट्रस्ट डॉक्टर दिंडीमध्ये उपचार केले जातात. त्यासाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे असणाऱ्या आठ रुग्ण वाहिका सदैव उपलब्ध असतात. इतकेच नाही तर सतत चालून वारकरी संप्रदाय यांच्या पायाला येणारी सूज, वेदना यावर माऊली ट्रस्टचे शेकडो स्वयंसेवक यांच्या हस्ते रोज पायाचे मसाज केले जातेय.
सध्या माळशिरसमध्ये माऊली ट्रस्टकडून कॅम्प उभारण्यात आला आहे. उष्णतेमुळे पायाला फोड येतात, जखमा होतात, वयस्कर लोकांचे गुडघे दुखणे, किरकोळ अपघात, ब्लडप्रेशर, सुगर असणारे वारकरी या कॅम्पचा लाभ घेतात. या कॅम्पमध्ये रोज २५ डॉक्टरांची टीम असते. दरदिवशी साधारणपणे ३ हजार ते ५ हजार वारकरी या कॅम्पमध्ये उपचार घेतात अशी माहिती दिंडी प्रमुख डॉ. दीपक मोहिते यांनी दिली.
माऊली ट्रस्टकडून वारकऱ्यांना मोफत अन्नदानमुंबईतील दादर स्वामी समर्थ मठातून महाराजांच्या पादुंकासोबत माऊली ट्रस्टची डॉक्टर दिंडी निघते. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ५ ठिकाणी वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जाते. जेजुरी, वेळापूर, बंडी शेगाव, वाखरीला २ दिवस वारकऱ्यांना जेवण दिले जाते.