पंढरपूर : अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, आल्हाददायी वातावरण, रिमझिम पाऊस व भर चिखलात घातलेला रांगोळीचा सडा अन् ज्ञानोबा, तुकोबांच्या जयघोषात वाखरी-बाजीराव विहीर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे गोल व श्रीसंत तुकाराम महाराज पालखीचे उभे रिंगण उत्साहात पार पडले. आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर पहिल्यांदाच पाऊस पडल्याने वारकरी अक्षरश: भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
भंडीशेगावकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीने बाजीराव विहीर येथे गोल रिंगण व वाखरी येथील शेवटच्या मुक्कामाकडे प्रस्थान केले. तर संत तुकाराम महाराज पालखीने पिराची कुरोली येथील पहिला मुक्काम उरकून वाखरीकडे प्रस्थान ठेवले. या दोन्ही पालख्या दुपारी ४ च्या दरम्यान पालखीतील शेकडो दिंड्या, लाखो वारकरी व त्यांच्या लवाजम्यासह बाजीराव विहीर येथे दाखल झाल्या.
याठिकाणी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे गोल रिंगण असल्याने माऊलींची पालखी नव्याने उभारलेल्या उड्डाण पुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोडने रिंगण स्थळाशेजारी दाखल झाली. तर तुकोबांची पालखी उड्डाण पुलावरून वाखरीकडे मार्गक्रमण करत होती. साडेचारच्या दरम्यान माऊलींच्या पालखीतील मानाचे वारकरी रिंगण स्थळावर दाखल झाल्यानंतर परंपरा व मानाप्रमाणे वीणेकरी, झेंडेकरी, टाळकरी, हांडेकरी, एकेक करत शेकडो दिंड्या रिंगण स्थळावर येत गोल कडे करीत होते. यावेळी रिंगण सोहळा पाहण्यासाठी दोन्ही पालख्यांतील जवळपास आठ लाख भाविक व आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत ५ वाजता हा रिंगण सोहळा अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी व आल्हाददायी वातावरणात पार पडला. यानंतर भाविकांनी खारीक उधळून आनंद साजरा केला. यावेळी भाविकांनी मनोरे, फुगड्या खेळून आनंद साजरा केला.
सतत पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण मैदान चिखलाने माखूनही सर्वच वारकरी चिखलात राडारिड होऊन ज्ञानोबा-तुकोबांच्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र होते.
चिखल असूनही घोड्यांनी वेगात घेतल्या दोन फेऱ्या बाजीराव विहीर येथे शेवटचा रिंगण सोहळा असला तरी दुपारपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे तेथे असलेल्या काळ्या मातीमुळे चिखलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. भर पावसात कसलीही मनी शंका न ठेवता पालखी प्रमुखांनी रिंगण सोहळा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अवघ्या काही क्षणात रिंगण आखण्यात आले. रांगोळीचा सडा, पोलिसांचे कडे व टाळ, मृदंग, अभंगाच्या गजरात चिखलातही घोड्यांनी वेगाने दोन फेऱ्या पूर्ण करत रिंगण सोहळा पार पडला.
............
रिमझिम पाऊस अन् पंढरपूर समीपचा आनंद
आळंदी-पंढरपूर मार्गावर आज झालेल्या पावसाप्रमाणे कुठेही समाधानकारक पाऊस झाला नाही. आज मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ नंतर वाखरी परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला. तरीही भाविक रिंगण पाहण्यासाठी भर पावसात ताटकळत उभे होते. अधून-मधून पडणारा पाऊस असला तरी पंढरपूर समीप आल्याचा आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. त्यामुळे वारीचा उत्साह आणखीनच वाढत असल्याचे चित्र होते.