- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - आषाढीचा सोहळा म्हटलं की विठ्ठलाचा जयघोष आलाच म्हणून समजा. सध्या पंढरपुरात आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने वारकर्यांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सर्वत्र विठ्ठल...विठ्ठल...माऊली..माऊली चा जयघोष दिसून येत आहे. राज्यभरातून अनेक पालख्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्या आहेत. दरम्यान, आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरूवारी धर्मपुरी (ता. माळशिरस) येथून सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला.
दरम्यान, या पालखीचे स्वागत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी खा. धैर्यशील मोहिते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर आदी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
माउलींच्या पालखीने आज पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल टाकले. ‘हरिनामाचा गजर’ करत लाखो भाविक पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत येत आहेत. पालखी स्वागतावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ व अन्य महत्वाचे अधिकारी वारकर्यांच्या वेषात दिसून आले.