पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचीही लगीनघाई ...विठ्ठल मंदिरातील सभामंडपातील मंच सजवलेला... आकर्षक फुलांची रोषणाई.. एरवी टाळ मृदंग आणि विठ्ठलाच्या नामघोषाने गजबजणाऱ्या विठ्ठल मंदिरात मंगळवारी मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळी जमली. दुपारी १२ वाजता विवाह सोहळा पार पडला. ‘या पंढरपुरात काय वाजतं गाजतं,सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं’ अशी प्रचिती भाविकांना आली.
सकाळी ११ वाजता विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र मोत्याचे दागिने,नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले. विठ्ठलासही पांढऱ्याशुभ्र वस्त्र आणि सुवर्णालंकारांनी सजवले होते. बेंगलोर येथील भाविक सविता चौधरी यांनी विठ्ठल रुक्मिणीस त्यांनी स्वतः बनवलेला पोशाख ‘श्री’ स घालण्यात आला.
रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातून विठ्ठलाकडे गुलाल नेला आणि तिथे उधळण केली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणीमातेकडे नेण्यात आला व तिथेही उधळण करण्यात आली. त्यानंतर उत्सवमूर्ती सभामंडपात आणली. यावेळी दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधल्या होत्या. अंतरपाट धरला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सपत्नीक विवाह लावण्यात आला. विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून, टाळ-मृदंगाचा जयघोष केला.
या विवाह सोहळ्यास मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य व नगराध्यक्षा साधनाताई भोसले, शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि मंदिर समितीच्या सदस्यांसह मोजकेच वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.
सोहळ्यावर कोरोनाचे सावट
२३ मार्च २०२० पासून कोरणाच्या प्रादुर्भावामुळे विठ्ठल-रुक्मिणी पदस्पर्श दर्शन बंद आहे. दोन महिन्यापाऊन मंदिर दर्शनासाठी खुले केले आहे. मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेता दररोज मोजक्याच भाविकांना गाभाऱ्यातून फक्त मुखदर्शन सुरू केले आहे. या सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते.
पाच टन फुलांनी सजवला मंदिर परिसर
हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी संपूर्ण मंदिर आणि गाभारा झेंडू, शेवंती, गुलाब, निशीगंध, ऍथोरीयम, ऑरकेड, कामीनी, तगर, अष्टर, बिजली, ग्लॅडीओ, जरबेरा, ड्रेसेना, तुळशी, इतर प्रकारच्या २५ ते ३० जातीच्या ५ टन आकर्षक फुलांनी सजविला होता. पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी मोफत फुलांची आरास केली
फोटो : १६ पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी १
१६ पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी २