पंढरपूर शहरातील उपनगरातील जुना कराड नका, गाताडे प्लॉट, गोकुळ नगर, मनीषा नगर, वांगीकर नगर, प्रशांत परिचारक नगर, मंगळवेढेकर नगर, आदी परिसरात रोज मोठ्या प्रमाणात चिकुनगुण्या रोगाची लक्षणे आढळून आलेले रुग्ण आहेत. यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
----
असा असतो डास
डेंग्यू, चिकुनगुण्या व झिका हा आजार हा एडीस डासाच्या प्रजातीपासून होतो. महाराष्ट्रामध्ये या प्रजातीच्या तीन प्रजाती या आजारांचा प्रसार करतात. एडीस इजिप्ताय, एडीस अल्बोपिक्टस व एडीस विटाटस यांच्यामार्फतच या आजारांचा प्रसार होत असतो. हे डास दिवसा चावतात त्यामुळे घरातील सर्व लोक बाधित करण्याची शक्यता असते. हे डास लोंबकळणाऱ्या वस्तू, पडदे, वायर यावरती तसेच अंधाऱ्या व थंड जागी विश्रांती घेत असतात. त्यांना मारण्यासाठी धूर फवारणी केली जाते. साचलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये हा डास अंडी घालतो. टायर्स, डबे, बाटल्या आदी घराच्या आजूबाजूला यामध्ये त्याचे प्रजनन होते, अशी माहीती जीव शास्त्रज्ञ किरण मंजूळ यांनी दिली.
अशी घ्यावी काळजी
घरातील, गावातील सर्व पाणीसाठे वाहते करावेत. साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत. जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे सोडावेत किंवा टेमिफाॅस या अळीनाशकांचा वापर करावा. गावामध्ये कोरडा दिवस पाळण्यात यावा. व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात. गटारी वाहती करावीत. घराच्या दारे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे. संध्याकाळी घरामध्ये धूर करावा. निरुपयोगी टायर जाळून नष्ट करावेत, असे डॉ. बजरंग धोत्रे यांनी सांगितले.
जनतेसाठी आवाहन
ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे. कोणताही ताप अंगावर काढू नये. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे. तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी व नगराध्यक्षा साधना भोसले याांनी केले आहे.
-----
खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांची गर्दी. (छाया : सचिन कांबळे)