पंढरपूर : शहरात अनेक ठिकाणी बोरवेल घेतली मात्र पाणी मिळून आले नाही अशा घटना निदर्शनास येत आहेत. तर या उलट ग्रामीण भागात कमी खोलीवर बोअरला तत्काळ पाणी लागल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर शहर झपाट्याने विकसित होत आहेत. शहरात मोठ्या इमारती उभारले जात आहेत. तसेच भुयारी गटार योजना राबवले जात आहेत. यामुळे शहरात पाण्याचा जास्त वापर, शहरीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्याचे प्रमाण हे गेल्या काही वर्षांत कमी झाले आहे. तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे सुद्धा जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.
या सर्वांचा परिणाम म्हणजे भूजल पातळी खूप झपाट्याने खालावत चालली आहे. परिणामी शहरात अनेक भागात बोअर घेतल्यास पाणी न मिळाल्याचे आढळून येत आहे. तसेच ३०० ते ४०० फूट खोल बोर करून ही पाणी लागत नाही. शहरात एकाच जमीन मालकाला दोन वेळा बोर घ्यावी लागत आहे. यासाठी विनाकारण होणारा आर्थिक खर्च त्यांना सहन करावा लागत आहे.पूर्वी शंभर टक्के एक ते दीड इंच पाणी लागत होते. आता शंभर टक्के पाणी लागेलच याची खात्री देता येत नाही. पाण्याचा उपसा खूप वाढला आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे.
यामुळे पावसाळ्यातील व रोज निर्माण होणारे सांडपाणी नागरिकांनी घराच्या परिसरात जिरवणे गरजेचे आहे. तसेच छतावरील पावसाचा प्रत्येक थेंबही भूजलाची पातळी वाढवण्यास वापरला पाहिजे. पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली जाते. यामुळे राहत असलेल्या परिसरात पाणी जिरवणे गरजेचे आहे.