खुडूस : माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती उत्तमराव जानकर यांना उपसभापती पदावरून दूर करण्यासाठी पांडुरंग देशमुख यांचा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार केलेला अपील अर्ज पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी फेटाळला. यामुळे उत्तमराव जानकर यांना दिलासा मिळाला आहे.पंचायत समितीचे उपसभापती म्हणून उत्तमराव जानकर यांची १४ मार्च २०१२ रोजी निवड झाली. या निवडीविरोधात जानकर यांना उपसभापती पदावरून दूर करण्यासाठी पांडुरंग देशमुख (रा. अकलूज) यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे ११ एप्रिल २०१२ रोजी अपील अर्ज केला होता. या अर्जात उत्तमराव जानकर, निवडणूक निर्णय अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांनाही पक्षकार करण्यात आले होते. अर्जदार जानकर व निवडणूक अधिकारी यांचे म्हणणे व युक्तिवाद न्यायालयात सादर केला होता. दोन्ही बाजूंनी सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ऐकून विभागीय आयुक्त पुणे यांनी अपील अर्ज फेटाळून लावला.माळशिरस पंचायत समितीची ७ फेब्रुवारी २०१२ रोजी निवडणूक निर्णय अधिकार्यांनी जाहीर केली होती. तर पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये नीलम सालगुडे-पाटील व प्रियांका पालवे यांच्या निवडीबद्दलचे प्रकरण माळशिरस जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले होते. यामध्ये नीलम सालगुडे-पाटील निवडून आल्याचे जाहीर झाले होते. याबाबत उच्च न्यायालयातही प्रकरण दाखल झाले होते. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार उपसभापती पदासाठीची निवडणूक व त्यामध्ये उपसभापतीपदी उत्तमराव जानकर यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली होती. (वार्ताहर)
उत्तमराव जानकर यांना विभागीय आयुक्तांकडून दिलासा जानकर यांना हटविण्यासाठी पांडुरंग देशमुख यांनी केलेला अपील अर्ज फेटाळला
By admin | Published: May 06, 2014 10:07 PM