पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्यात कोरोना संसर्गाने कहर माजवला आहे. रुग्णांना दिलासा देण्यासाठी कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती धावून आली आहे. डॉक्टरांनी नाममात्र भाडे देण्याची तयारी दर्शविली. मात्र, मंदिर समितीने सामाजिक भावनेतून नि:शुल्क देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे पांडुरंग कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आल्याची भावना पंढरीवासीयांतून होत आहे.
वेदांता व व्हिडिओकॉन भक्त निवासातील खोल्या व त्यामधील २०० बेड नि:शुल्क उपलब्ध केले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच सद्य:स्थितीत पंढरपूर शहर व परिसरात देखील मागील १५ दिवसांपासून रोज २०० ते २५० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. पंढरपूर शहर व परिसरातील सर्व कोविड रुग्णालय भरलेली असून, ६५ एकर व श्री. गजानन महाराज भक्तनिवास येथील कोविड केअर सेंटर मध्ये देखील जागा उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोविड केअर सेंटर तयार करण्यासाठी असलेली जागेची निकड लक्षात घेता, सर्व्हे नं. ५९ येथील वेदांता व व्हिडिओकॉन भक्तनिवासाच्या खोल्या व बेड गरज पडल्यास उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व इतर सर्व सदस्यांशी याबाबत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली होती. डॉ. अपर्णा तळेकर (रा. भोसे) यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना उपचार करण्यासाठी ‘कोरोना केअर सेंटर व प्रायमरी कोरोना हेल्थ केअर सेंटर’ सुरू करण्यासाठी श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास नाममात्र दराने भाडे तत्त्वावर मिळावे, अशी मागणी केली होती. त्याअनुषंगाने मंदिर समितीने बुधवारी विशेष सभेमध्ये मंदिर समिती ही धर्मादाय संस्था असल्याने तसेच पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने वेदांता व व्हिडिओकॉन भक्त निवासातील खोल्या व त्यामधील २०० बेड नि:शुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.