डॉ. यशवंत कुलकर्णी: पोळ्यासाठी प्रति मेट्रिक टन शंभर रुपये ऊस बिल बँकेत वर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीपूर : पांडुरंग कारखान्याची एफआरपी २४३१ रुपये प्रति मे. टन असून, कारखान्याने गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये पहिला हप्ता २१०० रुपये प्रति मेट्रिक टनप्रमाणे एकरकमी ऊस बिल दिले आहे. कारखाना बंद झाल्याबरोबर १३१ प्रति मे. टन ऊस बिल अदा केले आहे. आता पोळा सणाला शेतकऱ्यांनी १०० रुपयांप्रमाणे ऊस बिल दिले आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रति मे. टन २३३१ प्रमाणे ऊसदर मिळाला असून, उर्वरित रक्कमही लवकर देणार आहे. केंद्र शासनाने एफआरपी धोरणानुसार शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ९६ टक्के एफआरपी रक्कम अदा केली असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डों. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
पांडुरंग कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रति मेट्रिक टन शंभर रुपयांप्रमाणे ऊस बिल बँकेकडे वर्ग केले असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बिलाची एकूण रक्कम १० कोटी जमा केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना पोळ्यास व दिवाळीसारख्या सणांसाठी योग्य वेळी पैसे उपलब्ध करून दिले आहेत.
----
२०२०-२१ गाळप हंगाम अत्यंत उत्कृष्टपणे चालला. कोरोना काळात पांडुरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसाला पोळा सणाला प्रति टन शंभर रुपये बिल दिल्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे
-डों. यशवंत कुलकर्णी,
कार्यकारी संचालक