करणार पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व
करमाळा : तालुक्यातील पांगरे येथील अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधव टोकियो येथे होणाऱ्या पॅराऑलिंम्पिक २०२१ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. सदर स्पर्धेच्या अनुषंगाने जाधव तयारी करत असून, या स्पर्धेत त्याने देशाचे नाव उंचावणारी कामगिरी करण्याची ग्वाही दिली.
जपानमधील टोकियो येथे २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पॅराऑलिंम्पिक स्पर्धा होणार आहेत. यामध्ये जलतरणातील २०० मीटर वैयक्तिक मिडले आणि ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धा प्रकारात जाधव देशाच्या वतीने सहभागी होणार आहे. त्यातील २०० मीटर स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी, तर ५० मीटर स्पर्धा तीन सप्टेंबर रोजी होणार आहेत.
जलतरण विभागात भारताकडून पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला जलतरणपटू म्हणून सुयशचे नाव नोंद झाली आहे. २०१८ मधील जकार्ता आशियाई स्पर्धेत ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, तर २०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात कांस्य पदक मिळवून सुयशने देशाचे नाव उंचावले होते.
या दमदार प्रदर्शनामुळे सुयशची टोकियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुयशने यापूर्वी रियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धा २०१६मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. विविध स्पर्धांत सातत्याने यश मिळवून जागतिक खेळाडू म्हणून समोर आलेल्या सुयशला आता टोकियो पॅराऑलिंम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा उंचवायचा आहे. त्या पार्श्वभूमीवरच तो सध्या बालेवाडी (पुणे) येथील भारतीय प्राधिकरण क्रीडा केंद्रात तयारी करत आहे.
----
दिव्यांगावर मात करून मिळवलं यश
वयाच्या अकराव्या वर्षी एका अपघातात कोपराजवळून दोन्ही हात गमवावे लागलेल्या सुयश जाधवचा जागतिक खेळाडूपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. दिव्यांगावर मात करणाऱ्या सुयशने क्रीडा शिक्षक वडील नारायण जाधव यांच्यासह इतर मार्गदर्शक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपली कारकीर्द उंचावली आहे. आतापर्यंत विविध जलतरण स्पर्धांतून शंभरहून अधिक पदकांची कमाई करणाऱ्या सुयशला महाराष्ट्र शासनाने मानाचा एकलव्य पुरस्कार (२०१८), भारत सरकारने अर्जुन पुरस्कार (२०२०) देऊन गौरविले आहे.
----
१९ सुयश जाधव