प्रत्येक अटी मान्य करूनही अनेक जण अर्ज काढण्याच्या मन:स्थितीत नसल्याने काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३१६६ उमेदवारांनी ३३३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये छाननीत ३३ उमेदवारांचे अर्ज बाद करत त्यांना अपात्र ठरविले होते. अनेक गावांमध्ये दोन किंवा तीन पॅनल असले तरी त्यापेक्षा पूरक, अपक्ष असे तिप्पट अर्ज दाखल झाले होते. ते अर्ज काढण्यासाठी सोमवारी शेवटच्या दिवशी अनेक गावांतील पॅनलप्रमुखांची धडपड सुरू होती. पूरक अर्ज भरलेले व अपक्ष इच्छुक उमेदवारांचे अर्ज काढण्यासाठी तहसीलच्या आवारातच नाराजांची मनधरणी सुरू होती.
अनेक जण अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन मला अर्ज काढायचाच नाही म्हणत तेथून पळत काढत असल्याने अनेकांची धावपळ झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक जणांना धरून अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे काम काही कार्यकर्ते करत होते. काही इच्छुकांनी अर्ज काढले, मात्र त्यांच्या अनेक अटी घालूनच. अटी उद्या पाळो न पाळो, मात्र काही ठिकाणच्या उमेदवाऱ्या मागे घ्यायला लावण्यास पॅनलप्रमुख यशस्वी झाल्याचे चित्र दिसले.
चिन्हांसाठी अधिकाऱ्यांसमोर रंगले वाद
दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कायदेशीर बाबी पूर्ण करून चिन्हांचे वाटप सुरू झाले. मात्र प्रत्येक गावातील पॅनलप्रमुखांनी कपबशी, शिट्टी, बॅटरी, नारळ अशा महत्त्वाच्या चिन्हांचीच मागणी केली. मात्र ज्यांचे उमेदवारी अर्ज प्रथम दाखल झाले आहेत, त्यांनाच चिन्हांचे वाटप करताना प्रथम प्राधान्य अशी भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली. मात्र आमच्या पसंतीची चिन्हे आम्हालाच मिळाली पाहिजेत यासाठी अनेक पॅनलप्रमुख, इच्छुक उमेदवारांनी अधिकाऱ्यांशी वाद घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.
-----