सध्या बिबट्याचा वावर असलेल्या वांंगी, सांगवी, बिटरगाव, ढोकरी, भिवरवाडी या भागात सलगपणे उसाचे फड व केळीच्या बागा आहेत, यामुळे बिबट्याला लपण्यासाठी विस्तारीत जागा आहे. त्याला शोधणे वन विभागाला कठीण होऊन बसले आहे. बिबट्याचा आतापर्यंतचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा प्रवास लक्षात घेता त्याचे अस्तित्व आढळून आलेल्या बिटरगाव-वां, ढोकरी,वांगी नं.१ च्या दक्षिणेला उजनी धरणाचे अथांग पाणलोट क्षेत्र आहे. बिबट्या दक्षिण भागातून नदीपात्र ओलांडून पुढे जाऊ शकत नसल्याने त्याचा वावर धरणकाठावरील शिवारातच असल्याने या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत निर्माण झाली आहे.
-----तोड बंद तर केळीचा व्यवहार ठप्प
उजनीधरण काठावरील बिबट्याचा वावर असलेल्या शिवारात हजारो हेक्टर क्षेत्रात ऊस व केळीचे उभे पीक आहे. सध्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू असून, चिखलठाण येथे उसतोड कामगाराच्या मुलीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या दुर्घटनेपासून ऊसतोड मजुरांनी या भागातून दुसरीकडे स्थलांतर केले आहे. केळीचे सौदे करण्यासाठीसुद्धा परगावचे व्यापारी व दलाल या भागात येण्याचे टाळत आहेत.
- महेंद्र पाटील, बिटरगाव, वांगी.
जनजीवन विस्कळीत..
बिबट्याच्या भीतीने उजनी धरण काठावरील चिखलठाणपासून ते थेट कंदरपर्यंतच्या आठ ते दहा गावातील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ गावात असलेल्या बाजारपेठेत येत नाहीत. घरीच बसणे पसंत करीत आहेत. यामुळे बाजारपेठेत असणाऱ्या सर्वच दुकानदारांवर परिणाम झाला आहे. एकंदरीत बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- अण्णासाहेब पवार,कंदर
----