सोलापूर : सोलापुरातील उरल्यासुरल्या चादर शोरुम्समध्ये पानिपतच्या चादरींनी कब्जा केला आहे़ सोलापुरी चादरींचे उत्पादन घटल्याने येथील शोरुम्सदेखील घटले़ येथील शोरुम्समध्ये सत्तर टक्के चादरी या पानिपत आणि इरोड येथील आहेत़ पानिपतचे उद्योजक सोलापूर ब्रँडने चादरी तयार करतात आणि या चादरी आता येथील शोरुम्समध्ये सहज उपलब्ध होत आहेत़ परप्रांतातून आलेले नागरिक या चादरी सोलापुरी चादरी म्हणून खरेदी करताहेत़ यामुळे सोलापुरी चादरीचे वैभव संपुष्टात येईल, अशी भीती येथील उद्योजकांना आहे़ पानिपतच्या चादरी सोलापुरात विकणे ही बाब अत्यंत चिंताजनक असून यावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाने केली आहे.
दहा वर्षांपूर्वी सोलापुरातील दोनशेपेक्षा अधिक उद्योजकांकडे चादरीचे उत्पादन घेतले जात होते़ आता ती संख्या चाळिशीवर आली आहे़ त्यामुळे शोरुम्सची संख्या देखील आपोआप घटली़ पूर्वी सोलापुरात जवळपास पन्नास ते साठ चादर शोरुम्समध्ये सोलापुरी चादरींची विक्री होत असे़ आता केवळ दहा ते बारा शोरुम्स आहेत आणि या शोरुम्समध्ये सोलापुरी चादरींची संख्या केवळ पंचवीस टक्केच आहे़ उर्वरित पंचाहत्तर टक्के चादरी या सोलापुरी बनावटीच्या आहेत आणि या बनावट चादरींचे उत्पादन पानिपत येथे होते, ही धोकादायक बाब आहे़ वेळीच यावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी केली आहे़ ते म्हणाले, सोलापुरी चादरीला जिओग्राफिकल इंडिकेट अर्थात जीआय प्राप्त आहे़ याच्या बनावट उत्पादनावर कायद्याने बंदी आहे़ यावर प्रबोधन करणे गरजेचे आहे़ व्यापाºयांनी दक्ष राहण्याची गरज आहे, अन्यथा सोलापुरी चादरींचा उद्योग संपुष्टात येईल़
वर्षभराचे आयुष्य !- पानिपतच्या चादरी या सोलापुरी चादरींप्रमाणे सेम टू सेम असतात़ चादरीच्या किनारपट्टीवर सोलापूर चादर असे लिहिलेले असते़ रंगाने फिक्कट, पातळ आणि वजनाने हलके तसेच सोलापूरसारखे आकर्षक डिझाईन असे पानिपतच्या चादरींचे वैशिष्ट्य आहे़ या चादरींचे आयुष्य केवळ बारा महिन्यांचे असते़ त्या लवकर खराब होतात़ इरोडच्या चादरी देखील अशाच असतात़ पानिपतच्या चादरी या सोलापूर चादरींपेक्षा स्वस्त असतात आणि यात व्यापाºयांना अधिक मार्जिन मिळतो. त्यामुळे व्यापारी सोलापुरी चादरींपेक्षा पानिपतच्या चादरी विक्रीला प्राधान्य देतात.
सोलापूरच्या शोरुम्समध्ये पानिपत आणि इरोड येथील बनावटी चादरी मोठ्या प्रमाणात विकताहेत. ही चुकीची बाब आहे़ सोलापुरी चादर ही सोलापूरचे भूषण आहे़ . येथील वैभव आहे़ या वैभवाला मूठमाती देऊ नका. पानिपतच्या बनावटी चादरींना सोलापुरातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे़ येथील व्यापाºयांनी याकडे दुर्लक्ष करू नये. हे असेच सुरू राहिल्यास लोक भविष्यात फक्त पानिपत आणि इतर राज्यांतील चादरीच खरेदी करतील़ सोलापुरी उद्योग मागे पडेल़ संपुष्टात येईल. व्यापाºयांनी याचा जरुर विचार करावा.- अविनाश कोंडाचादरीचे जुने व्यापारी