सोलापूर : सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने पार्क स्टेडियमच्या सुशोभीकरणाच्या कामाची वर्कआॅर्डर दिली आहे. या कामासाठी पुढील आठवड्यापासून पार्क स्टेडियम बंद राहणार आहे. नऊ महिन्यात काम पूर्ण होणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने पार्क स्टेडियमच्या सुशोभीकरणासाठी २० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. स्टेडियमवर लवकरात लवकर आयपीएल, रणजी क्रिकेट सामने व्हावेत यासाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामांची निविदा काढण्यात आली होती. पुण्याच्या कृष्णाई कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले. स्मार्ट सिटी कंपनीने वर्कआॅर्डर दिली आहे. पुढील आठवड्यात कामाला सुरुवात होईल, असे कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.
सुशोभीकरणाच्या कामासाठी पार्क स्टेडियम बंद ठेवावे लागणार आहे. सध्या सकाळी आणि सायंकाळी याठिकाणी खेळाडूंचा सराव सुरू असतो. महापालिकेचे क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी पार्क स्टेडियमच्या तात्पुरत्या हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्यापुढे ठेवण्यात आला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर पार्क स्टेडियम स्मार्ट सिटी कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल.
- दहा खेळपट्ट्या, जिमखाना अद्ययावत होणार
- - आयपीएलच्या सामन्यासाठी स्टेडियमवर दहा खेळपट्ट्या तयार केल्या जातील. याशिवाय पावसाळी गटार, अमेरिकन ग्रास, अंपायर रुम, कॉमेंट्री बॉक्स, मीडिया रुम, अद्ययावत ड्रेसिंग रुम आदी कामे होतील. शेजारचा जिमखाना अद्ययावत होईल. या ठिकाणी बॅडमिंटन कोर्टसह इतर कामेही होतील.
- यांच्या मार्गदर्शनाखाली होणार काम
- - स्मार्ट सिटीचे सीईओ दीपक तावरे यांच्या काळात सुरू झालेले हे दुसरे महत्त्वाचे काम आहे. यापूर्वी त्यांनी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाची वर्कआॅर्डर दिली आहे. तांत्रिक आराखडा तयार करून घेतला आहे. तावरे यांनी पार्क स्टेडियमच्या सुशोभीकरणाच्या कामाचा तांत्रिक आराखडा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक लालसिंग रजपूत यांच्याकडून बनवून घेतला आहे. आता मक्तेदार कंपनीने खेळपट्टी बनविणारे प्रसिद्ध क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा खेळपट्ट्या तयार करण्याचे नियोजन केले आहे.