डी. एस. गायकवाड
टेंभुर्णी : शरद पवार यांच्यामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला असून, माढा तालुक्यातील शिंदे बंधूंच्या एकहाती सत्तेलाही धक्का बसला आहे.
शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतल्यापासूनच या मतदारसंघात राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. शरद पवार नाहीत तर मग कोण? याबाबत लोक चर्चा करीत होते. विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची पक्षाची तयारी होती, परंतु विजयदादा पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीबाबत आग्रही होते.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावास मतदारसंघातील मातब्बरांचा विरोध होता. यामुळे उमेदवारी कोणास द्यावी, याबाबत पक्षात संभ्रम होता. यात बराच वेळ गेला. दरम्यानच्या काळात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील चार-साडेचार वर्षांपासून राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपशी घरोबा केलेल्या संजयमामा शिंदे यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली. मागील दहा वर्षांपासून संजयमामा शिंदे व मोहिते-पाटील यांच्यात एकाच पक्षात असूनही टोकाचे मतभेद होते.
संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते-पाटील अधिकच सक्रिय झाले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे माढा तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. माढा तालुक्यातील शिंदे बंधूंचे सर्व विरोधक प्रथमच एकत्र आले. यातील काही मोहिते-पाटलांच्या नेतृत्वाखाली तर काहींनी थेट मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी संजय शिंदे यांना घेरण्याची रणनीती आखली. मागील चार वर्षांपासून भाजपने संजय शिंदे यांना राजकीय ताकद दिली. झेडपी अध्यक्ष केले.
लोकसभेची उमेदवारीही देऊ केली, परंतु आयत्या वेळी संजय शिंदे यांनी भाजपचा घरोबा सोडून पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले व पक्षाची उमेदवारीही स्वीकारली. मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्काच बसला. चंद्रकांतदादा पाटील यांनी तर संजय शिंदे यांना गद्दार म्हटले. यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून संजय शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी व्यूहरचना केली गेली.