रविंद्र देशमुखगावातल्या देशमुखांच्या गढीवरचा चौकीदार हल्ली गावातून फिरताना छाती फुगवून चालायला लागलाय. हनमान अळीतल्या ग्रॅज्युएट बबलूच्या नजरेतून त्याच्यातला हा कॉन्फीडन्स सुटला नाही...पाच वर्षांपूर्वी या चौकीदाराचं चौरस्त्यावर चहाचं दुकान होतं..इलेक्शनच्या काळात त्याहीवेळी त्याचा तोरा वाढला होता..पण पुढं तो तोरा उतरून गेला..चहाची टपरी चालेना म्हणून त्यानं चौकीदारी पत्करली होती. गढीचा दरवाजा सांभाळताना त्याला आतल्या टीव्हीतनं आवाज आला...भाई और बहनो, मैं चौकीदार...मेरे हात में देश सुरक्षित है..ही वाक्यं कानावर पडल्यानंतर चेपलेल्या छाताडात हवा भरून तो गावात फिरू लागला..त्याची ही चाल थोरल्या आबांच्या पण डोळ्यात खुपली..एरवी पारावर येऊन सर्वांशी बोलणारा चौकीदार. आबांकडून चिमूटभर तंबाखू घेऊन ती मळत मळत गढीवर जाणारा; पण आता पाराकडं तो ढुंकूनही बघेना..आबा अन् ग्रॅज्युएट बबलू चक्रावून गेले..राहावलं नाही म्हणून आबानं चौकीदाराला हाळी दिली..
ए..लका पांड्या..काय झालं रं तुला, लई छाती काढून चाललायं, इकडं बी बघं ना...काय ? देशमुखानं पगार वाढवलंय का ? आरं लका तंबाखू मागून खाणारा तू...आता का येवडा माजल्यासारखं करायलाय ?
आबांचा आवाज ऐकून चौकीदार पांड्या माघारी फिरला. थोडं ताठ मानेनंच पाराकडे चालू लागला..बबल्याला त्याचं चालणं अन् उसनं अवसान पाहून हसू फुटलं. पारावर येताच आबांना राम राम म्हणत चौकीदार म्हणाला...आबा,जिंदगानीत काय तर घावल्याचा आनंद व्हतुया बघा..पाच वर्षापूर्वी विलेक्शनच्या काळात अस्संच वाटत व्हुतं..चा ची टपरी चांगली चालत नव्हती, हे दुख इसरून गेलतो...आता बी तसाच आनंद!
पांड्या जरा सांग तर, आबा म्हणाले...आबा, पाच वर्षापूर्वी त्यो नेता म्हणत हुता, ‘मै चायवाला’... तवा मी चा इकत होतो...आता म्हनतोया ‘मै चौकीदार’..मग सांगा आबा, आमच्या कामाला मान मिळायंला की नाही?..चौकीदार पांड्या सांगू लागला..आबा,परवा तर देशमुखाच्या धाकल्या बायडीनं मोबाईल माझ्या जवळ आणला अन् टिव्टर ते काय तर असतंया ना, त्यावर दावलं..आपले राज्याचे कारभारी चौकीदार..सुभाषबापू बी चौकीदार!..आता सांगा आबा, एवढं मोठ्ठ लोकं सवताच्या नावाम्होरं चौकीदार लिव्हत असतील तर माझी छाती फुगनारंच की !
चौकीदार पांड्याचं बोलणं थोरल्या आबांना पटलं...एव्हाना पार गच्च भरून गेला होता..शेजारच्या गल्लीतला मल्लू, पाटलांचे तात्या, सरपंचाचा धाकला भाऊ बबन..सारेच पारावर बसून चौकीदार पांड्याचं बोलणं ऐकत होते..माना डोलवत होते...सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाºया ग्रॅज्युएट बबलूला पांड्याची टोपी खेचावी असं वाटलं अन् मोबाईलमध्ये चौकीदारावर आलेले विनोद ऐकवून तो पांड्याची खिल्ली उडवू लागला...
आबांना उद्देशून बबलू म्हणाला..आबा, या चौकीदारावर मोबाईलमध्ये लई इनोद यायला लागलेत, ऐकवू का?..आबानं हात पुढं करून हिरवा कंदील दाखविला...बबलू सांगू लागला...
आबा,सोलापुरातल्या एका इंजिनिअर मुलाचं म्हणं लगीन जमलेलं असतंय..लग्नाची तयारी झाली. मंगल कार्यालय ठरलं, दागिन्यांची खरेदी झाली...बस्ता बांधणार इतक्यात मुलीच्या बापाचा फोन आला...आम्हाला लगीन लावून द्यायचं नाय!..आता सगळेच घाबरून गेले. काय झालं अचानक? मुलीच्या बापाला इच्चारलं...त्यो म्हणतो कसा, तुमचं पोरगं इंजिनिअर हाय ना?...मग मोबाईलवर कस्सं लिव्हलंय, ‘मै भी चौकीदार’ आमच्या पोरीला चौकीदार नवरा नकोय..आम्हाला जावाई इंजिनिअर पाहिजे...आम्ही आमचं दुसरं स्थळ बघतो...या विनोदानं पारावर जमलेल्या सर्वांना हसू आलं; पण पांड्याचा चेहरा कसानुसा झाला.
आबा, दुसरा एक किस्सा सांगू?...बोल बोल बबलू, तात्या म्हणाले...तो सांगू लागला..परवा म्हणं शहरातल्या एका चौकीदारानं बिल्डिंगच्या मालकाला फोन करून सांगितलं..मालक, आता म्या कामावर येणार नाय..चौकीदारी बी सोडून देऊन दुसरा कामधंदा बघणार हाय...मालकाला प्रश्न पडला एकदम याला काय झालं..त्यांनी कारण इच्चारलं तर चौकीदार म्हणतो, आता सारा देश चौकीदार व्हायला लागलाय, मग आम्ही काय करायचं? मी आता दुसरं काम बघणार हाय...हा विनोदही सर्वांना आवडून गेला....गावातला चौकीदार पांड्या मात्र बबल्याच्या विनोदावर चिडला...पाय आपटत, आपटत तो देशमुखांच्या गढीकडे निघून गेला; पण आता त्याची छाती फुगलेली नव्हती...पाठीला बाक आला होता.