सोलापूर : नऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेवरही कोरोनाचे सावट राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी यंदा लांब पल्ल्यापर्यंत नंदीध्वज पेलणारेच ६८ लिंगांच्या मिरवणुकीत सहभागी असतील. मोजक्याच सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विधी व्हावेत. यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी अन् नियमांचे पालन करू. मात्र यात्रेत खंड पडता कामा नये, असे यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
देशभरात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा होईल अथवा होणार नाही? अशी सध्याची स्थिती असली तरी आजपर्यंत यात्रेत कधीच खंड पडला नाही. यंदाही त्यात खंड पडता कामा नये, असा सूर सिद्धेश्वर भक्तांमधून ऐकावयास मिळत आहे. दीड-पावणेदोन महिन्यांवर यात्रा येऊन ठेपली आहे. डिसेंबर महिना उजाडला की नंदीध्वज पेलण्याचा सराव सुरू असतो. १० दिवसांनंतर हा सराव सुरू होणार असला तरी अद्याप काही भक्तांच्या मनात यात्रेबाबत शंकाच आहे.
जानेवारी महिन्यातील १३ तारखेस तैलाभिषेक सोहळा, १४ रोजी अक्षता सोहळा, १५ रोजी होम प्रदीपन सोहळा आणि १६ जानेवारी रोजी शोभेचे दारूकाम असे यात्रेचे नियोजन आहे. यापैकी शोभेचे दारूकाम सोहळ्यास प्रशासनाकडून परवानगी मिळणार नाही. मात्र, शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या तीन प्रमुख सोहळ्यांना मोजक्या अन् निवडक भक्तांच्या उपस्थितीत परवानगी द्यावी, असे भक्तगण बोलून दाखवत आहेत. नियम पाळू, गर्दी हटवू... जे मोजके नंदीध्वजधारक, भक्तगण असतील, त्यांच्यात फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावर भर देऊ, मात्र यात्रा करण्यास परवानगी द्यावी, अशी बहुतांश मंडळींची मागणी आहे.
ब्रिटिश राजवटीतही यात्रेत खंड नव्हता...
ब्रिटिश राजवट असताना एकदा यात्रेत खंड पाडण्याचा प्रयत्न झाला. ऐन यात्रेत म्हणजे १२ जानेवारी रोजी सोलापुरातील चार हुतात्म्यांना फाशी देेण्यात आली. त्या दिवशी सातही नंदीध्वजांची मिरवणूक काही काळ थांबवून चार हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक सुरळीत झाली. सांगायचे कारण असे की, ब्रिटिश राजवटीतही यात्रेत खंड पडला नाही. आता शासना ने जे नियम घालून देतील, ज्या अटी लादतील, त्या साऱ्यांचे पालन करू. मात्र, यात्रेतील विधी झालेच पाहिजेत, अशी भूमिका सिद्धेश्वर भक्तांची आहे.
स्टॉलधारकही संभ्रमावस्थेत !
दिवाळीनंतर राज्यासह परप्रांतातील व्यापारी आपली दुकाने थाटतात. गेल्या मार्चपासून यात्रा, उत्सवांवर बंदी आलीय. बाजारपेठा सुरू झाल्या. आता सिद्धरामांची यात्रा होईल, अशी आशा स्टॉल टाकणारे व्यापारी बाळगून आहेत. स्टॉलबाबत काही व्यापारी पंच कमिटीच्या संपर्कात आहेत. मात्र शासनाचा निर्णय आल्यावरच स्टॉलधारकांना शब्द देणे योग्य आहे, असे पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी सांगितले.
दीपावली पाडव्यापासून श्री सिद्धेश्वर मंदिर खुले झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पंच कमिटीने पुरेपूर काळजी घेतली आहे. ही काळजी यात्रेतही घेतली जाईल. शासनाने ज्या काही अटी, नियम घालून देतील, त्यांचा आदर केला जाईल. शासन सांगेल त्याच पद्धतीने यात्रा पार पाडताना पंच कमिटीचे पूर्ण सहकार्य राहील.
-धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.
यात्रेतील चार दिवस नंदीध्वजांची मिरवणूक निघते. या मिरवणुकीत मोजकीच मंडळी असतील. सातही नंदीध्वजांमध्ये फिजिकल डिस्टन्स राखले जाईल. नियमित व्यायाम करणाऱ्या २५ ते ५० नंदीध्वजधारकांनाच नंदीध्वज पेलण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव आहे. शासन, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येईल. साधेपणाने यात्रा व्हावी, अशी अपेक्षा आहे.