दोन दिवस उलटून गेले तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस, शेकाप, भाजप, मनसे या पक्षांकडून उमेदवार फायनल होत नसल्यामुळे कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे नेतेमंडळींवरही प्रभागातील उमेदवार निश्चित करेपर्यंत ताण असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे गावपातळीवर स्थानिक नेतेमंडळी, प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. चौकाचौकात हॉटेल्स, पान टपरी, प्रभागात इच्छुकांकडून मतदारांच्या भेटीगाठीही सुरू आहेत.
दरम्यान, ६१ ग्रामपंचायतींच्या २३९ प्रभागातील तब्बल ६५९ सदस्यांच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. प्रभागनिहाय आरक्षणानुसार अर्ज दाखल करणे असल्यामुळे इच्छुकांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. स्थानिक नेतेमंडळींना प्रभागनिहाय उमेदवार निवडीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्थानिक नेतेमंडळींना प्रभागातील आपापल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची मर्जी राखून विश्वासातला उमेदवार निवडावा लागत आहे. त्यामुळे प्रभागातील छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. असे असले तरी प्रभागनिहाय निवडणुकीचा खर्च करण्याबरोबरच उमेदवार निवडून आला पाहिजे. यालाही महत्त्व असणार आहे. आपल्या पार्टीच्या विरोधात समोरचा उमेदवार कोण आहे, याचा अंदाज घेऊन त्यादृष्टीने उमेदवार निवडला जात आहे.
----
जास्तीत जास्त सदस्य निवडून येण्यासाठी प्रयत्न
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर म्हणजे १८ जानेवारी २०२१ नंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होणार आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-काँग्रेस यांची आघाडी व शेकाप, भाजप प्रभागानिहाय आपलेच सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून येतील, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी राहील, यासाठी कंबर कसली आहे.
-----
तोडीस तोड उमेदवार देण्यावर भर
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींपैकी कोळा, जुनोनी, हातीद, चोपडी, नाझरे, वाटंबरे, अकोला, कडलास, जवळा, घेरडी, महुद अशा मोठ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागातील उमेदवार निवडताना स्थानिक नेतेमंडळींना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातल्या त्यात समोरच्या पार्टीचा उमेदवार कोण आहे, याचाही विचार करून त्याच्या तोडीस तोड उमेदवार देण्यावर भर असल्याचे दिसून येते.