सोलापूर : राजकीय पक्ष, विचारसरणी भिन्न असली म्हणून काय झालं? मैत्र अन् नातं त्याआधीच आहे ना! राजकारणात कधी मंचावर येण्याचा प्रसंग आला तर प्रसंगी एकमेकांच्या राजकीय विचारसरणीवर कडाडून टीकाही करण्यात त्या कुणाचा मुलाहिजा बाळगणार नाहीत; पण विवाह अथवा कौटुंबिक समारंभात एकत्र आल्यानंतर मात्र सारं काही या हृदयीचं त्या हृदयी!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित यांचा विवाह नुकताच मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलात झाला... या लग्न समारंभाने या सखींना एकत्र आणलं... शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रणिती शिंदे अन् त्यांची ज्येष्ठ भगिनी स्मृती यांच्यासाठी अमितचा विवाह सोहळा निवांतपणे भेटणं, छान गप्पा मारणं अन् व्यक्तिगत शेअरिंग करण्याची संधी देणारा ठरला.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि उज्ज्वला यांच्यासमवेत आमदार प्रणिती आणि स्मृती शिंदे अक्षतापूर्वीच विवाहस्थळी दाखल झाले होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर रश्मीताईही आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत सुप्रिया लग्न मंडपात आल्या; तर अजित पवारांसमवेत सुनेत्रा यांचे आगमन झाले... शुभ मंगल सावधान!.. म्हणत गुरुजींनी शेवटची अक्षता म्हटल्यानंतर वधू-वरांना आशीर्वाद देऊन राजकीय पाहुणे विवाह स्थळातून बाहेर पडल्यानंतर... मांडवातील गर्दी कमी झाली अन् या सखींना निवांतपणे भेटण्याची संधी मिळाली.
सुशीलकुमार शिंदे यांचे ठाकरे आणि पवारांशी अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे प्रणिती आणि स्मृती या अगदी लहानपणापासूनच रश्मीताई, सुप्रिया अन् सुनेत्रा यांच्या परिचयाच्या. यापूर्वीही त्या अनेक कौटुंबिक समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत; पण आता प्रणिती, सुप्रिया राजकारणात असल्यामुळे रश्मी ठाकरे या उद्धव यांच्या राजकीय दौऱ्यात सहभागी होत असल्याने अन् सुनेत्रा याही अजित पवारांचे दौरे तसेच सामाजिक कार्यात सहभागी असल्यामुळे या सखींच्या भेटीगाठी तशा कमीच होतात. अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्यात त्यांच्या मनसोक्त गप्पाटप्पा झाल्या... शिवाय छायाचित्रकारांसाठी एकत्र येऊन छानशी पोजही दिली.
पक्षीय शृंखला तुटल्यार्वत्रिक निवडणुकांचे हे वर्ष, त्यामुळे आतापासूनच नेतेमंडळी एकमेकांवर राजकीय टीकास्त्र सोडण्यात मग्न झालेली असताना अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याने सर्वांनी पक्षीय शृंखला तोडून टाकल्या. एकमेकांना हस्तांदोलन केली. गळाभेटी घेतल्या. अगदी गप्पाही मारल्या... त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या दिशेने निघून गेले.