सोलापूर : दीड वर्षापासून मला किडनीचा त्रास आहे. काँग्रेसच्या मुलाखती झाल्या, त्या दिवशी खरेच मी मुंबईत होतो. तुम्हाला डॉक्टरची चिठ्ठी दाखवू का? तसेच आमदारांनी निवडणुकीसाठी मुलाखती द्यायच्या असतात का, असा सवाल आमदार भारत भालके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.
आमदार भारत भालके कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला नव्हता असे विचारल्यावर आमदार भालके म्हणाले, खरेच त्या दिवशी मी उपचारासाठी मुंबईला गेलो होतो. हवे तर त्यादिवशी मी डॉक्टरकडून घेतलेल्या उपचाराचे रेकॉर्ड दाखवितो. विद्यमान आमदारांनी मुलाखतीला यावे, असा आदेश कोणत्याच पक्षाने काढलेला नाही. आमदारांनी निवडणूक लढविण्यासाठी मुलाखतीला यावे तो काळ आता गेला आहे. त्यामुळे मला अजून रांगेतच उभे करू नका.
आगामी विधानसभा लढविताना तुमचा पक्ष कोणता असे विचारल्यावर आमदार भालके म्हणाले. जनता ठरवेल तो पक्ष. यापूर्वीच्या तीन निवडणुका मी गावकºयांशी चर्चा करूनच लढविल्या आहेत. त्याप्रमाणे माझ्या भेटीगाठी सुरू आहेत, त्यामुळे माझ्या मतदारात कोणताच संभ्रम नाही. भाजप प्रवेशाबाबत आमदार भालके म्हणाले की, मी कोणत्याच पक्षाकडे अर्ज केलेला नाही. आषाढी यात्रेनिमित्त राज्याचे प्रमुख, मुख्यमंत्री पंढरपूर भेटीला येत आहेत म्हणून मी विमानतळावर भेटीला गेलो. पाहुणचार म्हणून मी त्यांना नमस्कार केला, पण त्याची खूप चर्चा झाली.