आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सर्वत्र अनलॉक झाले...बाजारपेठा फुलल्या...वाहतूक सेवा सुरळीत झाली...रेल्वेचीप्रवासी सेवाही सुरू झाली; मात्र स्पेशल अन् फेस्टिव्हल गाड्यांच्या तिकीट दरामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा रेल्वे प्रवास महागला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या नियमित अन् पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी सेवा विस्कळीत झाली होती; मात्र अनलॉकनंतर हळूहळू रेल्वेची सेवा पूर्वपदावर आली आहे; मात्र कोरोनाकाळात सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन अद्याप सुरूच आहेत. या स्पेशल ट्रेनला नियमित गाड्यांपेक्षा अधिकचे तिकीट दर प्रवाशांकडून वसूल केले जात असल्याने एसटीपेक्षा रेल्वेचा प्रवास महागडा झाला आहे. जनरल डबे अद्याप बंदच असून सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. स्पेशल अन् फेस्टिव्हल रेल्वे गाड्यांमुळे तिकीट दरात वाढ झाली आहे.
-----------
सध्या सुरू असलेल्या स्पेशल गाड्या
- सोलापूर - मुंबई उद्यान एक्सप्रेस
- नागरकोईल एक्सप्रेस
- कोणार्क एक्सप्रेस
- हुसेनसागर एक्स्प्रेस
- चेन्नई-दादर एक्स्प्रेस
- कन्याकुमारी एक्स्प्रेस
- सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस
- सिद्धेश्वर एक्स्प्रेस
-------------दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून अनेक स्पेशल अन् फेस्टिव्हल गाड्या धावतात. यातील स्पेशल गाड्यांच्या तिकीट दरात २० ते १०० रुपयांपर्यंत (नियमित गाड्यांच्या दरापेक्षा) वाढ झाली आहे. तर फेस्टिव्हल गाड्यांना ५० टक्के तिकीट दर वाढविण्यात आलेला आहे.
----------
जनरल डबे कधी अनलॉक होणार
सध्या सर्वच नियमित गाड्या स्पेशल केल्या आहेत. त्यामुळे जनरल डब्यांचेेही रूप बदलले आहे. या जनरल डब्यात सेकंड सीटवाल्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. पाच जणांच्या सीटवर कोरोनामुळे आरक्षित तिकीट असणाऱ्या तिघांना सध्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीच्या सिझनमध्ये जनरल डब्यात पेपर अंथरुन खाली बसणारे प्रवाशांचे चित्र मात्र मागील तीन वर्षांपासून दिसत नसल्याचेही एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
-------------
स्पेशल भाडे कसे परवडणार
सोलापूर ते मुंबई जाण्यासाठी नियमित तिकीट दर २८० ते २९० रुपये आहे. मात्र सध्या धावत असलेल्या स्पेशल व फेस्टिव्हल गाड्यांना सोलापूर ते मुंबई जाण्यासाठी ४९० ते ५०० रुपये मोजावे लागतात. शिवाय सोलापूर ते पुण्यासाठी १७० ते १९० रुपये नियमित गाड्यांचे तिकीट दर आहेत, मात्र फेस्टिव्हल (उदा. मद्रास फेस्टिव्हल एक्स्प्रेस) गाड्यांना ४५० रुपये तिकीट दर आहे.