सोलापूर : प्रवाशांना घरबसल्या प्रत्येक एसटीची माहिती मिळावी व प्रवाशांचा वेळ वाचावा, यासाठी एसटी महामंडळाकडून व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम गाड्यांना बसविण्यात आली आहे. सोलापूर आगारातील जवळपास सर्वच गाड्यांना ही सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. पण याबाबत क्वचितच प्रवाशांना माहिती आहे. यामुळे अजूनही एसटी स्थानकात चौकशीसाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे.
सध्या कोरोनामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक हे पूर्णत: बदललेले आहे. यामुळे गाड्यांची माहिती घेण्यासाठी प्रवाशांना एसटी स्थानकातील चौकशी केंद्रात येऊन चौकशी केल्याशिवाय पर्याय नाही. पण चौकशी केंद्रावरील गर्दी कमी व्हावी व प्रवाशांना घरबसल्या एसटीची माहिती कळावी, एसटी प्रवाशांचा वेळ वाचावा, त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात आली आहे. पण या प्रणालीची माहिती देणाऱ्या ॲपची माहिती बहुतांश प्रवाशांना माहीत नाही. लवकरच याबाबत जनजागृती करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रणालीमुळे गाडी स्थानकात पोहोचण्याच्या अगोदर दहा मिनिटांपासून त्या गाडीची सूचना स्क्रीनवर दिसण्यास सुरुवात होणार आहे. सोलापूर विभागातील जवळपास सहाशे गाड्यांना ही प्रणाली बसविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर आगारात चार स्क्रीन
सोलापूर आगारात सर्व बसेसना ‘व्हीटीएस’ प्रणाली बसविण्यात आली आहे. यात काही शिवशाही गाड्यांना कंपन्यांमधून ही प्रणाली असून काही गाड्यांना विभागात आल्यानंतर ही प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच एसटी स्थानकातील प्रवाशांना प्रत्येक गाडीची माहिती मिळावी यासाठी सोलापूर स्थानकात दोन मोठे स्क्रीन, ग्रामीण स्थानकावर स्क्रीन आणि मोहोळ स्थानकावर एक स्क्रीन, असे मोठे स्क्रीन लावण्यात येत आहेत.
प्रवाशांना ॲपची प्रतीक्षाच
व्हीटीएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम ॲपचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार होते. पण हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर या ॲपची सध्या ट्रायल सुरू करण्यात आली आहे. लवकरच याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
प्रवाशांना घरबसल्या मिळणार एसटी गाड्यांची माहिती
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिममुळे गाडी स्टँडवरून बाहेर पडताच त्या गाडीची जीपीएस सिस्टिम चालू होईल आणि या सिस्टिमद्वारे गाडी कितीच्या स्पीडने रस्त्यावर धावत आहे, रस्त्यावर आरटीओ नियमांचे पालन झाले का नाही, गाडी चालविताना ड्रायव्हरने किती वेळा जोरात ब्रेक मारला, कितीवेळा गाडी वेडीवाकडी चालवली तसेच नियोजित मार्गावर गाडी न चालवता दुसऱ्या मार्गाने चालवली का, याची परिपूर्ण माहिती एसटीमधील अधिकाऱ्यांना बसल्या ठिकाणी कळणार आहे.