सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कर्नाटकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची जिल्ह्याच्या सीमांवर कोरोनाची टेस्ट होणार असून, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने तशा लेखी सूचना चालक-वाहकांना दिल्या आहेत. तपासणीसाठी एस. टी. गाड्यांंना काही काळ थांबावे लागणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जाणार असला तरी सुरक्षित प्रवासासाठी कर्नाटक महामंडळाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांची तपासणीही केली जात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि मागणी लक्षात घेऊन सोलापूर आगारातून कर्नाटकसाठी जवळपास १४ फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत. यात ९ फेऱ्या हैद्राबाद मार्गावरील आहेत. हैद्राबादला जाताना गाड्यांना कर्नाटकातून जावे लागते. या शिवाय गुलबर्गा, इंडी, सिंदगी, यादगीर, गाणगापूर या मार्गावर एसटी गाड्या धावत असतात.
कर्नाटकातून सोलापूर आगारात दिवसा जवळपास ३० पेक्षा जास्त गाड्या धावत असतात. या सर्व गाड्यांमधील वाहक-चालकांना कर्नाटक एसटी प्रशासनाकडून लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवासी गाडीत बसताच वाहकांकडून प्रवाशांना कोरोनाची टेस्ट केली जाणार असल्याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत. शिवाय ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसतील त्या प्रवाशांना तेथेच क्वारंटाईन केले जाईल, अशा प्रकारच्या सूचना देण्यात येत आहेत. ज्या प्रवाशांनी कोरोनाची टेस्ट केलेली आहे, त्यांनी आपण निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्रवास करताना सोबत ठेवावा असे आवाहन कर्नाटकातील वाहकांनी केले आहे.
प्रवासी-वाहकामध्ये वाद
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व वाहकांना प्रवाशांना गाडीत बसवताना खबरदारी घेण्याच्या लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. धुळखेडजवळ सर्व प्रवाशांच्या तापमानाची तपासणी केली जात आहे. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळतील त्यांची पुढील टेस्ट तेथे होत आहे. यामुळे प्रवासी गाडीत बसताच आम्ही त्यांना सूचना देत आहोत. नव्या नियमामुळे प्रवासी हे आमच्याशी काहीवेळा वाद घालत असतात, अशा प्रतिक्रिया एका महिला वाहकाने दिली.
---------
कर्नाटक प्रशासनाच्या निर्णयाबाबत अद्याप आम्हाला कोणतेही लेखी पत्र मिळालेले नाही. सोबतच या मार्गावरील कर्मचाऱ्यांनी याबाबत आम्हाला माहिती दिलेली नाही.
- विलास राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी