डॉक्टर आणि रुग्णांच्या नात्याची चर्चा आजकाल वारंवार केली जात आहे़ रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले त्याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. खरेतर पूर्वीचे रुग्ण आणि डॉक्टरांचे नातेही वेगळे असायचे. अशी दोन उदाहरणे मी या मालिकेतून तुमच्या समोर मांडतो आहे. सद्यपरिस्थितीत अंतर्मुख करणाºया या दोन्ही घटना आहेत. मागच्या आठवड्यात यातली एक कथा आपण वाचलीत.
डॉक्टरांच्या मनात रुग्णासाठी कणव असते, पण त्याच्या रुग्ण आणि नातेवाईकांकडेही खूप मोठे उदार असे मन असते याची जाणिव मला या घटनेने करून दिली होती. आज आणखी एक कथा आपण जरुर वाचावी. खरेतर यापूर्वी आम्ही डॉक्टर मंडळी या बाबींबद्दल फारसा विचारही करीत नव्हतो कारण आम्ही हे गृहीतच धरीत होतो की आपला पेशा हा रुग्णाच्या सेवेसाठीच आहे़ काहीही झाले तरी रुग्णाचे कसे भले होईल हाच एकमेव विचार आपल्या मनात असायचा आणि आजही असतो.
भले त्यासाठी आपल्याला कितीही वेळ द्यायला लागू दे, त्या व्यवहारात आपला फायदा होऊ दे अथवा न होऊ दे, कधी कधी तर तोटा सहन करूनही आम्ही आमचा व्यवसाय करीत आलो आहोत आणि मला खात्री आहे की करीत राहू या विषयावर विचार करताना काही वर्षांपूर्वीचे मनाला चटका लावणारे एक उदाहरण मला आठवते. डॉक्टरांच्या मनात रुग्णासाठी कशी कणव असते त्याचे एक छानसे उदाहरण म्हणता येईल अशी ही घटना आणि मला आनंद आणि अभिमान वाटतो की यातला डॉक्टर मी आहे़
२००६ मधली घटना असावी ही. एक आठ ते दहा वर्षांची चुणचुणीत मुलगी माझ्याकडे एका जनरल प्रॅक्टीशनरने रेफर केली होती. तिच्या छातीच्या मधल्या हाडावर एक गाठ होती आणि ती काढायची होती. मी साधारण अंदाज घेऊन ते लोकलखाली म्हणजे तिथल्या तिथे भूल देऊन काढायचा प्लॅन केला. खर्चाचा अंदाज मी तिच्याबरोबर असलेल्या तिच्या आईला दिला. जीपीलाही फोन करून सांगितलं. तो म्हणाला डॉक्टर, खूपच कमी बिल घेताय तुम्ही. त्या एक्सवायझेड डॉक्टरांनी तुमच्या तिप्पट खर्च सांगितला होता. कन्सेंट, अॅडव्हान्स वगैरे फॉरमॅलिटीज पूर्ण करून मी आॅपरेशन चालू केले. लोकलखाली असल्याने मी तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. ती कुठल्या शाळेत जाते़ कोणत्या इयत्तेत आहे़ क्लासटिचर कोण वगैरे, वगैरे. सहज मी तिला विचारले, शाळा सुटल्यावर काय करतेस गं? खेळायला जातेस की नाही तिचं उत्तर ऐकून मी थक्कच झालो.
डॉक्टर, शाळा संपली की मी घरीच असते. मी किनई वह्या शिवते. आईला मदत करते. दररोज शंभर रुपये कमावते मी. मी विचारलं, बाबा? ते नाही का काम करत. तिने शांतपणे सांगितले बाबा खूप दारू पितात ना, म्हणून आम्ही काम करतो. मी, माझी आई आणि ताई मिळून दररोज वह्या शिवून पाचशे रुपये कमावतो आम्ही. आमचं घर चालवितो आम्ही. तिच्या बोलण्यात सार्थ अभिमान डोकावत होता. मी मात्र विचारात मग्न झालो होतो. एवढ्या छोट्या वयात किती प्रौढ झाली होती ही चिमुरडी.
आॅपरेशन संपलं. माझ्या डोक्यात काही वेगळेच विचार चालू होते़ तिच्या बिलाची काही रक्कम परत करायचा विचार होता माझा. खरेतर तेवढेच मी तिच्यासाठी करू शकत होतो. मी रिसेप्शनिस्टला विचारलं, पैसे भरलेत का? तिने सांगितले, हो. त्यावर त्यांनी मी अश्विनीला जाऊन येतो. आल्यावर डिस्चार्ज करूयात असे म्हणत गडबडीत जम्मा हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. अश्विनीतली कामे संपवून परत आलो, पाहतो तर काय. ती चिमुरडी आणि तिची आई केव्हाच निघून गेले होते, गडबडीत डिस्चार्ज घेऊन. मला खूपच वाईट वाटले. मी रिसेप्शनिस्टवर चिडलोही. पण उपयोग काही नाही झाला़ काही दिवस गेले़ रिसेप्शनिस्टने मला सांगितले, सर, तुमची आवडती पेशंट आज टाके काढायला आलेली आहे. मी तिला बिलातली काही रक्कम परत करायला सांगितली. तिची आई ते परत घ्यायला तयार नव्हती. म्हणायला लागली, डॉक्टर, आॅपरेशनमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का म्हणून पैसे परत देताय. मला कारणही सांगता येईना. शेवटी मी रिसेप्शनिस्टला मार्केटमध्ये पाठविलं. सांगितलं, मोठ्यात मोठं जे कॅडबरीचं पाकिट मिळेल ते घेऊन ये. त्या चिमुरडीला दिलं आणि मला नकळत घडलेल्या चुकीची भरपाई केल्यासारखं वाटलं.
एक जबाबदारीचं ओझं उतरल्यासारखे वाटलं. माझी पेशंट म्हणते कशी, डॉक्टर, मला तुम्ही चॉकलेट का दिलं ? मी म्हटलं, अगं, एक अतिशय गोड मुलगी आहेस ना आणि मला खूप आवडली आहेस म्हणूऩ खूश होऊन मला टाटा करून ती निघून गेली. मी मात्र विचार करीत होतो, नक्की का बरे मी हे केले असावे? रुग्ण आणि डॉक्टरच्या नात्याचा एक वेगळा आविष्कार होता तो बहुधा. आजही आठवण झाली की मनाला खूप समाधान वाटते.-डॉ़ सचिन जम्मा(लेखक हे लॅप्रोस्कोपिक व जनरल सर्जन, सोलापूर)