आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : एक डॉक्टर घडायला साडेचौदा वर्षे लागतात. मृत्यूच्या दाढेत उभ्या असणाºया माणसासाठी प्रत्येक डॉक्टर देव असतो. मात्र त्यांनी सांगितलेले शुल्क देताना घासाघीस केली जाते. डॉक्टरच्या हातून एखादी चूक घडल्यास रुग्णांचे नातेवाईक कायदा हातात घेतात. यामुळे संबंधित रुग्णालयच नव्हे तर त्या डॉक्टरचेही जीवन उद्ध्वस्त होते. त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टरातील संबंध अधिक दृढ व्हावेत, समाजाने डाक्टरांची सेवा समजून घ्यावी, असे भावपूर्ण आवाहन जगविख्यात नेत्रविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.सोलापूर लोकमत आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुजरात भवनात रविवारी २५ कर्तृत्ववान डॉक्टरांचा गौरव करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, ‘लोकमत’ सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्ज्वल करण्यात आले.आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात पद्मश्री डॉ. लहाने यांनी डॉक्टरांचा आणि उपस्थित नागरिकांचा क्लासच घेतला. ते म्हणाले, समाजाप्रति असलेले डॉक्टरांचे समर्पण मीडियानेही लक्षात घ्यायला हवे. रुग्ण आणि डॉक्टरांमधील सुसंवाद नीटपणे झाला नाही तर समस्या निर्माण होते. त्यामुळे डॉक्टरांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशोकराव चव्हाण आरोग्यमंत्री असताना आपण मागणी केली. त्यानंतर डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट अस्तित्वात आला. मात्र प्रोटेक्शनची वेळच येऊ नये, असे काम करायला हवे. आज कट प्रॅक्टिसची चर्चा जोरात होत आहे. मात्र ती कोण करतात, हे सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. एखादा वकील न्यायालयात उभा होताना लाखो रुपये घेतो. मॉलमध्ये खरेदी करताना अथवा आॅनलाईन वस्तू मागविताना म्हणेल तेवढी रक्कम आम्ही देतो. मग मृत्यूच्या दाढेतून रुग्णाला परत आणणाºया डॉक्टरांचे शुल्क देतानाच घासाघीस का ?वैद्यकीय पेशाचा गौरव करताना ते म्हणाले, वैद्यकीय पेशा हा एकच व्यवसाय असा आहे, ज्यात त्याग आहे. डॉक्टर हा सर्वात त्यागी असतो. त्याला घडायला आयुष्याची साडेचौदा वर्षे लागतात. रुग्णसेवा करताना स्वत:च्या सुखाकडे दुर्लक्ष करून डॉक्टर मंडळी काम करतात. डॉक्टरांना आवाहन करताना ते म्हणाले, आपला व्यवसाय सेवाभावाचा आहे, हे विसरू नका. आधी स्वत:तील कीड काढा. कट प्रॅक्टिस टाळा. सेवाभावी पिढी निर्माण करा. अन्य प्रोफेशनमध्ये केसेस होत नाहीत. मात्र डॉक्टरांवरच अधिक होतात. कारण आपलेच समव्यवसायी दुसºयाबद्दल वाईट बोलतात. हे टाळायला हवे. कुणीच डॉक्टर रुग्णाचे वाईट चिंतत नसतो, हे समाजाने समजून घ्यायला हवे. प्रत्येक रुग्णाचे शरीर वेगळे असते. त्याच्यावरील उपचारपद्धतीही वेगळी असते. एकमेकांचे पाय आपणच ओढतो, म्हणून ग्राहक न्यायालयात आपल्याला ओढले जाते. २००४ पासून डोळ्यांच्या एकाही डॉक्टरवर खटला नाही. कारण ही पथ्ये आम्ही पाळली आहेत़ डॉक्टरांना संघटित होण्याची गरज आहे. तुमच्या चांगल्या कामाचे प्रमाणपत्र ‘लोकमत’ने दिले आहेच. त्याचा वापर समाजाच्या भल्यासाठी करा, असे आवाहन त्यांनी केले.पालकमंत्री देशमुख म्हणाले, डॉक्टर्स हे समाजाचे जीवनदाते असल्याने या घटकाची जबाबदारी मोठी आहे. शासनाकडून गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. डॉ. लहानेंसारख्या सेवाभावीकडून सोलापुरातील डॉक्टरांचा सन्मान होणे ही मोलाची बाब आहे. राज्यात एकही मोतीबिंदू रुग्ण राहू नये, यासाठी शासनाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. सोलापूरसाठीही त्यांचे मोठे योगदान आहे. डॉक्टरांच्या समाजासाठी असलेल्या योगदानाचा गौरव करून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, सोलापूर हे मेडिकल हब म्हणून नावारूपास येत आहे. २०२०-२१ च्या व्हिजन आराखड्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. सोलापूर हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून, आंध्रप्रदेश, कर्नाटक, पश्चिम महाराष्टÑाशी जुळलेले आहे. त्या दृष्टीने प्रशासन आराखडा आखत आहे. ते पुढे म्हणाले, डॉक्टर म्हणून काम करीत असताना डॉक्टरांची सेवा जवळून बघितली आहे. त्यांचे समर्पण समाजाने समजून घ्यावे. ‘लोकमत’ने पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यातून सर्वांना बळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे म्हणाले, आपण ज्यांना घडताना पाहिले ते आज उत्तुंगपणे काम करताना पाहून आनंद होत आहे. या व्यासपीठावरून त्यांचा सत्कार होताना पाहून समाधान वाटत आहे. त्यांनी अशीच सेवा देत राहावी. गरिबांना मदत करावी आणि या शहराचे नाव मोठे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व सत्कारमूर्ती डॉक्टरांच्या वतीने त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नितीन ढेपे यांनी प्रातिनिधिक भावना व्यक्त केल्या. प्रारंभी ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, लोकमत यंदा शतक महोत्सव साजरे करीत आहे. सोलापूरची आवृत्ती वाचकांच्या प्रतिसादामुळे रौप्यमहोत्सवी वर्षात वाटचाल करीत आहे. आजवर ‘लोकमत’ने समाजाच्या प्रत्येक घटकाच्या उद्धारासाठी काम केले आहे. शिवाय गुणवंत आणि समाजासाठी झटणाºया मान्यवरांचा सन्मान केला. वैद्यकीय सेवेत मोलाचे योगदान दिलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यामागेही हीच भावना आहे. या समारंभाचे आभार सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी मानले. ‘लोकमत’चे प्रादेशिक विभाग प्रमुख शंकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
रूग्ण-डॉक्टरांचे संबंध अधिक दृढ व्हावेत ! तात्याराव लहाने यांचे आवाहन, सोलापूर ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी समारंभात डॉक्टरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 3:45 PM
सोलापूर लोकमत आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुजरात भवनात रविवारी २५ कर्तृत्ववान डॉक्टरांचा गौरव करण्यात आला, व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, ‘लोकमत’ सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे उपस्थित होते.
ठळक मुद्देवैद्यकीय पेशा हा एकच व्यवसाय असा आहे, ज्यात त्याग आहे : डॉ. तात्याराव लहानेरुग्णसेवा करताना स्वत:च्या सुखाकडे दुर्लक्ष करून डॉक्टर मंडळी काम करतात : डॉ. तात्याराव लहाने कट प्रॅक्टिस टाळा. सेवाभावी पिढी निर्माण करा : डॉ. तात्याराव लहाने