वैराग : रातंजन (ता. बार्शी) येथील उपकेंद्रावर जखमी रुग्णांना स्वत:च मलमपट्टी करावी लागत असल्याची निराशाजनक घटना घडत आहे.
रातंजन उपकेंद्रांतर्गत रातंजन, सर्जापूर व लाडोळे अशी तीन गावे येत असून, या ठिकाणी एक समुदाय आरोग्य अधिकारी, एक आरोग्य सेविका, एक मदतनीस व एक सफाई कामगार एवढा कर्मचारी वर्ग आहे. विजय अंकुश पवार (रा. रातंजन) हे शनिवारी सकाळी शेतात काम करताना पायाला जखम झाली म्हणून रातंजन उपकेंद्रात जखमेला मलमपट्टी व औषधोपचारासाठी आले होते. त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी बाहेर पायरीवर बसवून हाताने ड्रेसिंग करण्यासाठी साहित्य आणून दिले. पवार यांनी स्वत:च मलमपट्टी करून घेतली.
----
तुमचे ड्रेसिंग तुम्ही करा
मी औषधोपचारास गेलो असता उपस्थित कर्मचारी फोनवर बोलण्यात व्यस्त होते. त्यांनी तुमचे ड्रेसिंग तुम्ही करा किंवा परत जावा, असे सांगितले. येथील कर्मचाऱ्यांचे रुग्णांशी बोलणे नीट नसल्याचे पवार यांनी सांगितले.
----
त्यांनी स्वत:च ड्रेसिंग करून घेतली
आम्ही रुग्णांना चांगली सेवा देत आहोत. पवार यांना जखम झाल्याने ते सकाळी लवकर आले होते. सफाई करणारे कर्मचारी आले नसल्यामुळे आम्ही स्वत: उपकेंद्राची स्वच्छता करीत होतो. तोपर्यंत पवार यांनी हाताने ड्रेसिंग करून घेतले, असे समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती भगत यांनी सांगितले.
---