सांगोला : येथील ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, सुविधा असून देखील केवळ डॉक्टरांच्या उदासीनतेमुळे अपघातग्रस्त रुग्णांना तात्पुरती मलमपट्टी करून पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी पाठविले (रेफर) जात आहे. शिवाय सांगोल्यास जोडणाऱ्या रस्त्यावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर युनिटची मागणी सांगोला तालुकावासीयांमधून होऊ लागली आहे.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात बाह्य व आंतर रुग्ण तसेच विविध आजारावरील सुमारे ५० हजार रुग्णांवर उपचार केल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी दिली.
सांगोला ग्रामीण रुग्णालयात विविध आजारावर उपचारासाठी गोरगरीब रुग्णांची नेहमी गर्दी असते. परंतु रुग्णांवर किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला मिळत असल्याने नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयात नवीन सुविधा उपलब्ध नाहीत. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असली तरी सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची उपचारांसाठी हेळसांड होत आहे. सांगोला ग्रामीण रुग्णालयात वर्षभरात बाह्यरुग्ण विभागात ४६ हजार ३५३ रुग्णांवर तर आंतररुग्ण विभागात २ हजार १६९ रुग्णांवर उपचार करण्यात आले.
नेत्र विभागात ३७३ रुग्णांवर उपचार झाले. ३०७ गर्भवती महिलांची नॉर्मल (नैसर्गिक) प्रसूती तर २०४ महिलांचे सीझर (शस्त्रक्रिया) केल्या आहेत. २५५ महिलांना तांबी बसविली तर ९ महिलांची असिसटेड प्रसूती केली. ११५ कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून वर्षभरात ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या १३९ महिलांना खाजगी रुग्णालयात (पाठविले) रेफर केले. तर १८३३ रुग्णांना देखील इतर रुग्णालयात रेफर केल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
अशा परिस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांचे पद गेल्या ८ वर्षांपासून रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकीय अधिक्षकावर रामभरोसे चालू आहे.
----------
नातेवाईकांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला
रस्ते अपघातातील गंभीर जखमी असो किंवा विविध आजाराच्या रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळत नसल्याने सांगोला ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशा गैरसोयीचे झाले आहे. विशेष बाब म्हणजे गंभीर रुग्णांना इतर खाजगी दवाखान्यात रेफर करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला जातो. त्यामुळे सांगोला ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्रच बनले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगोला ग्रामीण रुग्णालयाकडे विशेष लक्ष देऊन सर्वसामान्य रुग्णांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिवसेना प्रमूख कमरूद्दीन खतीब यांनी केली आहे.
----