सोलापूर : थंडीच्या दिवसात रक्तवाहिन्या कमी तापमानाला प्रतिसाद देऊन आकुंचन पावतात. रक्तदाब जास्त असताना रक्तवाहिनी आकुंचन पावली तर दाब अजून वाढू शकतो. प्रत्येक रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देते, यावरून त्याला हृदयविकाराचा धक्का बसेल की नाही, हे अवलंबून असते. यासाठी रुग्णांनी थंडीच्या दिवसात रक्तदाबावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
बाजारात १,२०० ते १,५०० रुपये दरम्यान मिळणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून रक्तदाब तपासता येतो. या यंत्राचा वापर करून कामाला जाण्याआधी, कामावर असताना, कामावरून घरी आल्यानंतर आणि सर्वात शेवटी रात्री झोपताना रक्तदाबाची तपासणी करावी. कोणत्या वेळेत रक्तदाब वाढतो, हे लक्षात येणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस कामाच्या ताणामुळे त्याच वेळेत रक्तदाब वाढू शकतो. नियमितपणे तपासणी केलले रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले तर सात दिवसात एखाद्या विशिष्ट वेळी रक्तदाब साधारण असतो किंवा विशिष्ट वेळी रक्तदाब वाढतो हे कळते. यावरून डॉक्टरही वेळेनुसार औषधांची मात्रा ठरवतात. एखाद्या वेळेस औषधांचा डोस वाढवायचा असेल तर ते वाढवू शकतात.
थंडीच्या दिवसात अशी घ्या काळजी
साधारणपणे शरीराचे तापमान हे ३७ (९८.६ अंश फॅरेनहाइट) अंश सेल्सिअस असते. ३५ अंश सेल्सिअसपर्यंत माणसाचे शरीर सहन करू शकते. पण, या त्याच्यापेक्षा कमी झाले तर रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे अशा काळात काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांना आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी नियमितपणे औषधे घ्यावीत, शरीर गरम राहील याची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
हृदयाच्या आरोग्यासाठी नको व्यसन
रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या ठिसूळ झालेल्या असतात. साधारणपणे रक्तदाब १२० असायला हवा. यापेक्षा जास्त रक्तदाब झाला तर रक्तवाहिन्यावर ताण पडतो. यामुळे रक्तवाहिन्याची जाडी वाढत जाते. याचा परिणाम म्हणून रक्तवाहिनी फाटू शकते. त्यात चरबीच्या गाठी जमा होत जातात. अशात रुग्णाला व्यसन असल्यास रक्त घट्ट होण्याची प्रक्रिया वाढत जाते. रक्त घट्ट झाले तर ब्लॉक तयार होतो. हृदयाचा रक्तपुरवठा बंद होऊन हृदयविकाराचा धक्का बसू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्याची गरज आहे.
प्रत्येकाचे शरीर थंडीला कसा प्रतिसाद देऊ शकतो हे सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णाच्या औषधात वाढ करण्याची गरज असतेच असे नाही. यासाठी नियमितपणे (कमीत कमी दिवसातून तीनदा) रक्तदाबाची तपासणी करावी. याचा अहवाल डॉक्टरांना दाखवावा. जेणेकरून ते औषधे व काय काळजी घ्यायची, हे निश्चितपणे सांगू शकतात.
- डॉ. विजय अंधारे, हृदयविकार तज्ज्ञ, सोलापूर.