सोलापूर : लठ्ठ व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक बेरियाट्रिक ओटी टेबल छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार आहे. अडीचशे किलोचा लठ्ठ रूग्ण पेलण्याची या टेबलची क्षमता आहे. दरम्यान, या टेबलचा उपयोग ज्या विभागात होणार ंआहे, त्या लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्या उद्घाटन होणार आहे.
या अत्याधुनिक आॅपरेशन टेबलची किंमत १० लाख रुपये असून, कोइमतूर येथून तो सोलापूरकडे आणण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. गरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. त्याबाबत जागृती व योग्य असे उपचार करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्राच्या आत तसेच बाहेरही फलक लावण्यात येणार आहे.
रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास अत्याधुनिक साहित्याची गरज असते. या अनुषंगाने बेरियाट्रिक ओटी टेबल व इतर साहित्य आणण्यात आले आहेत. या टेबलचे वैशिष्ट्य म्हणजे यावर २५० किलोचा रुग्ण मावू शकतो. जुन्या पद्धतीच्या टेबलवरुन रुग्ण पडण्याची शक्यता असते. नव्या टेबलमुळे ही शक्यता नसणार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेगवेगळ्या बाजूने हलवता येऊ शकते. यामुळे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना अधिक सोपे होते. या टेबलची हालचाल रिमोटनेही करता येते.
असा ठरवतात व्यक्तीचा लठ्ठपणा..- लठ्ठपणा ठरवताना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी बीएमआय हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्म्युला उपयोगात आणला जातो. यावरुन कोणती व्यक्ती लठ्ठ आहे कोणती नाही हे ठरवले जाते. बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग यावरुन बीएमए काढला जातो. भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते.