माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांना पितृशोक; जेष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 09:07 AM2020-10-03T09:07:42+5:302020-10-03T09:08:29+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : अक्कलकोट तालुक्याचे जेष्ठ नेते सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रें (वय ९१ वर्षे) यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने दुधनी येथील राहत्या घरी निधन झाले.
दुधनी नगरपालिकेचे ते सलग ४0 वर्षे नगराध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव राज्यात अव्वल स्थानी आणले होते.माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आणि अक्कलकोटकाँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे ते वडिल होते.
सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीच्या जोरावर दुधनी भागासह संपूर्ण अक्कलकोट तालूका,विजापूर,गुलबर्गा सीमावर्ती भागात वेगळी ओळख निर्माण केली होती.तालूक्याच्या राजकीय पटलावर त्यांचा दबदबा होता.विशेष म्हणजे ते दुधनी नगरपालिकेवर ४० वर्षे बिनविरोध नगराध्यक्ष होते.
दुधनीसह तालूक्यातील अनेक वर्षापासूनची भांडणतंटे सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी त्यांच्या लोकन्यायालयातुनच मिटविले.धर्मकार्य आणि गोरगरिबांना दानधर्म करण्यासाठी सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नेहमीच हात पूढे असायचे.
१९७४ साली भाई छन्नोसिंग चंदेले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.ते आमदार झाले;त्यांच्या आमदारकीसाठी सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा सिंहाचा वाटा होता.तेव्हापासून आजतागायत म्हेत्रे परिवार हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
सातलिंगप्पा म्हेत्रे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते होते, तसेच भाई छन्नोसिंग चंदेले, तत्कालीन मंत्री कै.नामदेवराव जगताप,माजी कृषीमंत्री शरद पवार, माजी मंत्री मल्लिकार्जून खर्गे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांची निकट मैत्री होती. त्यांच्यावर शनिवारी दुपारी २ वाजता दुधनी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तालुक्याचा एकनिष्ठ व खंबीर नेता हरवल्याची खंत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली. संपूर्ण अक्कलकोट तालूक्यासह जिल्ह्यात सातलिंगप्पा म्हेत्रे यांना भिष्मपितामह या नावाने संबोधले जायचे.