शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जिल्ह्यात वाहनांच्या अपघातामध्ये वन्यजीवांचा जीव जात आहे. हे रोखण्यासाठी वन विभाग, वन्यजीवप्रेमी व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांची संयुक्त टीम तयार करण्यात येणार आहे. अपघाताची ठिकाणी शोधून तिथे उपाययोजना करण्यात येणार आहे.
वन विभागातर्फे वन्यजीवप्रेमी व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत वन्यजीवांचा जीव वाचविण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा झाली. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, सहाय्यक वनसंरक्षक बी. जी हाके, पंकज चिंदरकर, मुकुंद शेटे, संतोष धाकपाडे आदी उपस्थित होते.
उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. निवडलेल्या अपघात प्रवण जागेवर भेट देण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. यंदाच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करावी लागणार असल्याची सूचना करण्यात आली. जिल्ह्यात काही ठिकाणी वन्यजीवांची शिकार होत असल्याच्या सांगण्यात आले. त्या ठिकाणी पेट्रोलिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक त्या ठिकाणी जाळी लावणे, रबरस्ट्रीप लावणे, वन्यजीवांचा अपघात होऊ नये या जागृतीसाठी फलक लावणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
येथे होतात वारंवार वन्यजीवांचे अपघात- बोरामणी जवळील महामार्ग, नान्नज- गुळवंची रस्ता, वळसंग टोलनाका, सोरेगाव ते हत्तूर रस्ता, केगाव- देगाव रस्ता, माळकवटा - मंद्रुप रस्ता (आवटे वस्ती), बंकलगी- सुलेरजवळगी, चिखली रोड (मोहोळ), मोडनिंब महापारेषण केंद्राजवळ, वरवडे, करमाळा - झरेफाटा, कामती, सावळेश्वर कॅनॉल परिसर, पंढरपूर- कुर्डुवाडी रोड (माळीवस्ती).