पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे बिबट्यासदृश प्राण्याने पुन्हा विजय मोरे या शेतकºयाच्या जर्सी गाईवर हल्ला करत जखमी केल्याने खळबळ उडाली आहे. या गाईला शस्त्रक्रियेनंतर तब्बल ३५ टाके घालावे लागले. या प्रकारानंतर वनविभाग बिबट्यासदृश प्राण्याविषयी गंभीर नसल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.
पटवर्धन कुरोली परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्यासदृश प्राण्याचा वावर आहे. या प्राण्याने ऊसतोडणी कामगाराच्या ४ महिन्यांच्या चिमुकलीचा जीवही घेतला आहे. मात्र अजूनही वनविभाग हा प्राणी बिबट्या असल्याचे मान्यच करायला तयार नाही. बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाने कॅमेरे लावले, पायांचे ठसे घेतले, गस्त पथक तयार केले. मात्र त्यापुढे वनविभाग कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
२ जानेवारी रोजी मध्यरात्री पटवर्धन कुरोली, ८ मायनर येथील विजय मोरे यांच्या शेतातील वस्तीवर घरासमोर बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला केला. त्यात गाय गंभीर जखमी झाली. विजय मोरे हे गुरुवारी सकाळी पहाटे गाईच्या गोठ्यात शेण काढण्यासाठी गेले असता गाईचे पोट फाटलेले, तेथे रक्त सांडलेले पाहिल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी हा प्रकार इतर शेतकºयांना सांगितला. काही वेळातच ही गोष्ट वाºयासारखी परिसरात पसरली. गाईला पाहण्यासाठी शेतकºयांनी गर्दी केली होती.