सोलापूर : कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाइकांना आता पन्नास हजार रुपये अनुदान मिळणार आहे. अनुदान देण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी आदेश काढून सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना केल्या आहेत.
कोरोनामुळे जे नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, त्या मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजारांचे अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती; परंतु याबाबत राज्य शासनाकडून आदेश प्राप्त नसल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत कोणतीही भूमिका घेतली नव्हती.
अनुदानासाठी अनेक नागरिक जिल्हा प्रशासनाकडे विचारणा करीत होते. अनुदान मिळणार आहे; परंतु वाटपाची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे प्रशासनाकडे येणारी माणसं नाराज व्हायची. आता ही कटकट संपली असून, जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणेला ५० हजार रुपये अनुदान वाटपाचे आदेश दिले आहेत.
संबंधितांना अनुदानाचा अर्ज सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्र व शासनाच्या संकेतस्थळावर दाखल करता येईल. हा अर्ज दाखल करताना अर्जदारांनी स्वतःचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, इतर निकटवर्तीय नातेवाइकांचे ना-हरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र, मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक देणे आवश्यक आहे. याबाबतची आवश्यक ती प्रसिद्धी तालुका, गाव पातळीवर देण्यात यावी आणि सर्व संबंधितांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात यावे, तसेच वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरणेकामी तालुका, गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्रात, सेतू सुविधा केंद्रामध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात यावे व तालुक्यातील सर्व कोविडच्या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाइकांचे ऑनलाइन अर्ज मोफत भरून घेण्यात यावेत. यासाठी स्वतंत्र खिडकी, कक्षाची स्थापना करण्यात यावी. यामध्ये कोणतीही व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी केली आहे.