अकलूज (सोलापूर) : शरद पवार निवडणुकीच्या मैदानात ओपनिंग बॅटसमन म्हणून आले, परंतु बारावा गडी म्हणून न खेळताच बाहेर पडले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील पवारांच्या माघारीची खिल्ली उडवली.
अकलूज (ता. माळशिरस) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराची सुविधा आम्ही दिली. सिंचन विद्युतीकरण यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ऊस उत्पादकांचे भले लक्षात घेता त्यांच्या उत्पन्नाची साधने आम्ही वाढवत आहोत. इथेनॉलच्या उत्पन्नासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. हे सर्व शरद पवार करू शकले असते, परंतु आपली साखरेची दुकाने सुरळीत चालावित, यासाठी त्यांनी या बाबींकडे लक्ष दिले नाही. पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, २३ मे नंतर जे सरकार बनेल ते मोदी सरकारचे असेल़ शेतकºयांना भविष्यात मोठा लाभ आम्ही देणार आहोत़ पाण्यासाठी विशेष जलशक्ती मंत्रालय स्थापन करून एक मंत्री, एक पूर्ण विभाग त्या कामासाठी लावू माढा लोकसभा मतदारसंघासाठी हे मंत्रालय एक वरदान ठरेल.
राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर निशाना साधून ते म्हणाले, दिल्लीचा एक खास परिवार आहे. शरदराव़़ तुम्ही त्यांच्याकडून शिकता त्यांच्या सेवेत असता. दिल्लीचा परिवार तुमचा मॉडेल आहे़ शरदराव तुम्ही तुमचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा विजयसिंह मोहिते- पाटील, आ. नारायण पाटील, शिवसेनेचे शिवाजी सावंत, सुधाकरपंत परिचारक, आ. निलमताई गोरे, माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचनताई कुल, आ. प्रशांत परिचारक, माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, उत्तमराव जानकर आदी उपस्थित होते.