सोलापूर - शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शेतकरी आंदोलनासारख्या अनेक विषय त्यांच्यासमोर आहेत, राष्ट्रपतींना भेटून त्यांनी त्यावर चर्चा केली, परंतू मराठा आरक्षणासारख्या विषयावर राष्ट्रपती असो अथवा पंतप्रधानांना भेटण्यास त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टोलेबाजी करीत आ. विनायक मेटे यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार श्रेयवादासाठी मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची थेट टीका केली.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षण मिळवून देण्याची जबाबदादी सत्ताधारी पक्षांची असतेच याविषयावर एकमेकांकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण मिळाले आता ते आरक्षण चुकीचे दिल्याची चर्चा काही सत्ताधारी नेते करीत आहेत. मग त्यावेळी त्यात दुरूस्ती का सुचविली नाही. आरक्षण मिळाले याचा फारसा आनंदही त्यांनी त्यावेळी का व्यक्त केला नव्हता. आता मात्र आरक्षण आबाधित राखण्याऐवजी सरकारमधील दोन पक्षांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आहेत. मराठा समाजाच्या कल्याणापेक्षा ओबीसीच्या मतावर डोळा ठेवून विजय वड्डेटीवार व छगन भुजबळ भूमिका वटवत आहेत असा आरोप आ. विनायक मेटे यांनी केला.