विठ्ठल कारखान्याचा २०२०-२१ गळीत हंगाम २२ नोव्हेंबर २०२० रोजी सुरू होऊन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी बंद झालेला आहे. या हंगामात गळितास आलेल्या उसाच्या बिलाचे पेमेंट २० डिसेंबर २०२० पर्यंत २०५० रुपयेप्रमाणे वाटप केले आहे.
२१ डिसेंबर २०२० ते १३ फेब्रुवारी २०२१ अखेरील ३९ कोटी रुपयांचे ऊसबिल अद्याप दिलेले नाही. तसेच कामगारांचे ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ ते एप्रिल २०२१ असे एकूण १७ महिन्यांचे पगार व इतर देणी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम पेमेंट देणे बाकी आहे.
तसेच ऊसतोडणी वाहतुकीचे मागील व चालू हंगामातील पेमेंटही देणे बाकी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये व पंढरपूर तालुक्यामध्येही कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे सभासद, कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार हे स्वत: व त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती कोरोनाच्या संसर्गामुळे दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या औषध उपचारासाठी, शेतीच्या व इतर कामासाठी पैशाची त्यांना अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष भेटून वारंवार ऊसबिलाबाबत, पगाराबाबत विचारणा करीत आहेत. आपण या बाबींचा गांभीर्याने विचार करून सभासद, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार यांना लवकरात लवकर पेमेंट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी युवराज पाटील यांनी केली आहे.
भालकेंच्या अडचणीत वाढ
आमदारकीच्या निवडणुकीपूर्वी युवराज पाटील व सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांच्यामध्ये अध्यक्षपदावरून तू तू मै मै झाली होती. परंतु राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दोघांची समजूत काढून मनोमिलन घडवलेे; परंतु पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांचा पराभव झाला. यानंतर काही महिन्यात विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागणार आहे. शेतकऱ्यांचे ऊसबिल, पगार व अन्य मुद्द्यावरून विरोधक भगीरथ भालके यांना टार्गेट करत होते. परंतु आता विठ्ठल परिवारातील नेते, संचालक भालके यांना जाब विचारू लागले आहेत. यामुळे भालके यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत असल्याची चर्चा आहे.
कोट
कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केल्यास कारखान्याचे कामगार, सभासद यांची बैठक घेऊन पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहे.
- युवराज पाटील,
संचालक, विठ्ठल सहकारी साखर कारखाना