रुपेश हेळवे
सोलापूर : सध्या लॉकडाऊनमुळे शाळा ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीमध्ये शाळा जरी सुरू होणार नसतील तरी काही पालकांना पाल्याचे प्रवेश निश्चितीसाठी फी भरा असे फोन करण्यात येत आहेत. यामुळे पालकवर्ग त्रस्त असून सध्या शाळाच सुरू नाहीत तर फी कशी भरायची? असा प्रतिप्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
कोरोनामुळे प्रशासनाच्या वतीने १५ जुलैपासून शाळा आॅनलाईन सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. शाळा प्रत्यक्षात जरी सुरू नसल्यातरी काही शाळा आॅनलाईन पद्धतीने सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण सुरू आहे म्हणून पालक स्टेशनरी घ्यावी, शाळेची फी भरावी असे म्हणत आहेत.
शाळांनी चालू शैक्षणिक वर्षाची फी मागू नये, जर फी भरायची असेल तर चार हप्त्यामध्ये फी भरण्याची सोय करून द्यावी, असे आदेश प्रशासनाने शाळांना दिले आहेत; पण तरीही काही शाळा मनमानी पद्धतीने पालकांना फी भरण्यासाठी दबाव आणत आहेत. मागील तीन महिन्यांपासून अनेक पालकांचे रोजगार बंद होते. सध्या मुले ही घरीच आहेत तर फी का भरायची असा प्रतिप्रश्न पालक करत आहेत.
अन्यथा शाळेवर कारवाई करू!सध्या कोणत्याही शाळांनी पालकांना फी भरण्यासाठी जबरदस्ती करू नये असा शासन निर्णय आहे आणि फी भरण्यासाठी पालकांना बंधनकारक करायचे नाही.फी च्या नावाने मुलाला शाळेतून कमी करता येणार नाही. विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करू, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.
माझा मुलगा पाचवीत आहे; पण सध्या शाळा बंद असूनही शाळेकडून फी भरण्यासाठी मला फोन केले. तुमच्या मुलाच्या प्रवेश निश्चितीसाठी तर तुम्हाला किमान एक हजार रुपयेतरी भरावे लागतील असे सांगण्यात येत आहे यामुळे मी सध्या कोड्यात पडलो आहे.
- राजेश परसगुंड, पालक