तालुक्यात अनेक कर्जदार शेतकरी कर्ज भरण्यास सक्षम असूनही कर्जमाफीच्या आशापोटी थकित राहत आहेत. यामुळे संस्था आर्थिक डबघाईला आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संलग्न असलेल्या गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांनी पाच दशकाहून अधिक काळ मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र अलीकडील काळात थकित कर्जामुळे बँका आणि शेतकरीही अडचणीत आले आहेत.
शासनाने घेतलेले कर्ज भरण्यास सक्षम नसणाऱ्यांसाठी वारंवार कर्जमाफीची योजना आणूनही त्याचा विपरित परिणाम प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यावर झाला आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणारे अनुदान अद्याप मिळालेले नाहीत. यामुळे आता शेतकऱ्यांनी आपले थकित कर्ज भरल्यास आणि विविध कार्यकारी सोसायटीचे नो ड्यूज प्रमाणपत्र बँकांना दिल्यास थेट कर्ज मिळू शकते, असे बँकांकडून सांगण्यात येत आहे.
.. तर कर्ज मिळण्यास मार्ग मोकळा
शासनाने बँकेचे व्यवहार सुरळीत असणाऱ्यांसाठी तान लाखांपर्यंत नुकताच बिनव्याजी कर्ज देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यासाठी हंजगी, खानापूर, म्हैसलगे केवळ या तीन सोसायट्या वगळता उर्वरित ८६ संस्था अपात्र आहेत. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळणे अशक्य आहे. थकित कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे.
----
संस्था अन् गरजू शेतकऱ्यांना मिळेल दिलासा
तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेशी ८९ संलग्न विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. शेकडो शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज थकीत ठेवल्यामुळे आज केवळ तीन सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरून नव्याने घेतल्यास संस्था व गरजू शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आता शेतकऱ्यांनी सोसायट्यांचे कर्ज भरून थेट बँकेकडून कर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे वरिष्ठ बँक निरीक्षक राजकुमार तेलुणगी यांनी दिली.