सोलापूर : सध्या मार्च महिना सुरू आहे. या महिन्यात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थकीत वीजबिल वसुलीसाठी थकीत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात तगादा लावत आहेत. अशातच बनावट मॅसेजने अनेकांना चांगलाच धक्का दिला आहे. दिलेल्या लिंकवर क्लिक करा.थकीत वीजबिल भरा अन्यथा रात्रीपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशा फसवणूक करणाऱ्या संदेशामुळे वीजग्राहक वैतागले आहेत. नुकताच सोलापुरातील एका प्रसिद्ध डॉक्टरास असा संदेश आल्याने त्यांनी आपल्या पोलिस मित्राला सांगितले आणि ही बाब समोर आली.
वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉटस् ॲप’ संदेश पाठविण्यात येत आहेत. मोबाईल कॉल देखील करण्यात येत आहेत. यामध्ये ज्यांचा वीजबिलांशी काहीही संबंध नाही अशा नागरिकांना किंवा वीजबिल पूर्वीच भरलेले आहे, अशा वीजग्राहकांना देखील बनावट संदेश पाठविण्यात येत आहे.
सावधगिरी न बाळगता नागरिकांनी या बनावट संदेशांना किंवा कॉलला प्रतिसाद दिल्यानंतर फक्त ऑनलाइनद्वारेच वीजबिल भरण्यास सांगणे, त्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटची लिंक पाठवणे किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. नागरिकांनी या बनावट संदेशांना प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून संबंधित बॅक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येत आहे. वीजग्राहकांनी कोणत्याही लिंकला क्लिक करून पैसे पाठवू नये किंवा कोणताही ओटीपी, पासवर्ड अनोळखी व्यक्तीला देऊ नये असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे.
महावितरणने केले महत्वाचे आवाहन...वैयक्तिक स्त्रोतांद्वारे थकीत वीजबिल भरण्याबाबत बनावट ‘एसएमएस’, ‘व्हॉटस्ॲप’ संदेश पाठवून तसेच मोबाईल कॉलद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या बनावट संदेश किंवा कॉलवर विश्वास ठेऊ नये. तसेच पाठवलेली लिंक ओपन किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजबिलांचा सुरक्षित भरणा करण्यासाठी ग्राहकांसाठी महावितरणचे मोबाईल ॲप व महावितरणच्या अधिकृत वेबसाईटचा वापर करावा असेही आवाहन महावितरणने केले आहे.