सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात आहेरवाडी येथील एका शेतकऱ्याने कुलदैवताच्या मूर्तीला सोन्याच्या मिशीने मढवत आहे. गावातील कलह दूर होऊ दे अन् शांती, समाधान लाभू दे, असं देवापुढं बोलल्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्यामुळे आहेरवाडी येथील शेतकरी महांतेश्वर फुंडीपल्ले यांनी सोलापुरातून कुलदैवतेच्या मूर्तीला सोन्याची मिशी बनवून घेतली आहे.
सात ग्रॅम सोन्यापासून स्थानिक कारागिरानं ही कलाकृती साकारली आहे. सोलापुरातील सराफ मिलिंद वेणेगुरकर यांनी ही मिशी बनवली आहे. फुंडीफल्ले हे वस्तीवर राहतात तर त्यांच्या कुलदैवत वीरभद्रेश्वराचे गावाजवळ मंदिर असून, या मंदिरात देवाची चार फूट मूर्ती आहे. या देवाला ते सातत्याने वेळेवर पाऊस पडू दे देवा, गावात शांतात नांदू दे, कलह होऊ देऊ नको ,असा नवस बोलला होता. तो पूर्ण झाल्याने त्यांनी या देवाला सोन्याची मिशी बनवून ती अर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि पाच दिवसांपूर्वी त्यांनी सराफाकडे सोन्याची मिशी बनवायला ऑर्डर दिली.
सोलापुरात कोलकात्यातील बंगाली कारागिरांची संख्या मोठी आहे. बहुतांश प्रकारचे दागिने या कारागिरांकडून बनवून घेतले जात असले तरी फुंडीपल्ले यांच्या कुलदैवताला सोलापुरातील स्थानिक कारागिरांनी सोन्याची मिशी बनवली आहे.
असा आकार दिला..सराफ व्यावसायिकांनी गावात जाऊन मूर्तीवर अर्थात मुखवट्यावर कागद ठेवून प्रेस करून आकार मिळवला. पेपरवरील आकारावरून रेडियमवर आकार उमटवला. रेडियमचा आकार सोन्याच्या पत्र्यावर ठेवून मिशीचा आकार दिला.