सोलापूर - शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माढा तालुक्याचे माजी आमदार भाई एस.एम.पाटील (वय ९२) यांचे रविवारी दुपारी पुण्यात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पुण्यातील बिर्ला रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेकापच्या माध्यमातून त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नावर मोर्चे व आंदोलने करुन सातत्याने वाचा फोडली. शेतमालाला योग्य भाव आणि शेतकºयांना वीज व पाणी मिळावे यासाठी ते सतत झगडत राहिले. शेतकरी व त्यांचे अर्थकारण याबाबत एक अभ्यासू नेते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते. गेली ४० वर्षे ते सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. काही वर्षे त्यांनी बँकेचे उपाध्यक्षपदही सांभाळले होते. रयत शिक्षण संस्थेचेही ते उपाध्यक्ष होते. शेतकºयांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँका जगल्या पाहिजेत आणि सरकारने त्यांना मदत केली पाहिजे यासाठी अखेरपर्यंत ते लढा देत राहिले. भाई एस.एम.पाटील हे १९६७ मध्ये माढा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना अलीकडेच पुण्यात बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘लोकमत’च्या सल्लागार मंडळाचे सदस्य जलमित्र अनिल पाटील व रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य अॅड. बाळासाहेब पाटील यांचे ते वडील होत.
शेकापचे माजी आमदार भाई एस. एम. पाटील यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 5:55 PM