अक्कलकोट : अक्कलकोट आगाराच्या एसटी बसने जोरदार धडक दिल्याने सांगवी बु., ता. अक्कलकोट येथील एक तरुण शेतमजूर जागेवर ठार झाला आहे.
महादेव शिवाजी देवकर (वय ३२), असे मरण पावलेल्या शेतमजुराचे नाव असून रविवार, दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता सांगवी बस्थानकावर हा अपघात झाला. उत्तर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
पाेलीस सूत्राकडील माहितीनुसार सांगवी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ते पाहण्यासाठी महादेव शिवाजी देवकर (वय ३२) हा रस्त्याच्या कडेने निघालेला होता. इतक्यात वागदरीहून अक्कलकोटकडे निघालेली बस (एमएच-१४ बीटी-०५०१) आली. तेव्हा चालक आरोपी दिलीप खंडू कलाल (रा. हसापूर रोड, ता. अक्कलकोट) याला बसवर ताबा मिळवता न आल्याने महादेव देवकर याला घडक बसली.
याबाबत महादेव याचा भाऊ प्रवीण देवकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यांना तात्काळ गावातील केशव देवकर, प्रदीप सलबत्ते, सचिन घाटगे, प्रवीण घाटगे यांनी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर दुपारी अडीच वाजता सांगवी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली, तीन भाऊ, असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
----
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस अंमलदार विपीन सुरवसे, अंगद गीते, पोलीस नायक धनराज शिंदे, अंमलदार कुमार गोडसे, नामदेव माने यांनी घटनास्थळी धाव घेतली.
---
चालक स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर
आरोपी एसटी चालक दिलीप कलाल (वय ५७, रा. हसापूर रोड, अक्कलकोट) हा अपघातानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यांला अटक केली आहे. चालक कलाल यांची सेवा केवळ एक वर्ष शिल्लक राहिलेली आहे.
---
फोटो : ०५ सांगवी एस.टी.
०५ महादेव देवकर
सांगवी बु. येथे एसटी बसने महादेव देवकर यांना धडक देऊन दिल्याने ते जागेवर मृत अवस्थेत पडलेले दिसून येत आहेत.