सांगोला : भरधाव वेगातील टेम्पो व जीपची समोरासमोर धडक होऊन पिकअप चालकासह पादचारी जागीच ठार झाला तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला.
रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील फॅबटेक महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. या अपघातात लक्ष्मण हिंदुराव पवार (३५ रा. लोकरेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) आणि चंद्रकांत बबन ढेकळे (रा.पंढरपूर) अशी मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार लोकरेवाडीतील लक्ष्मण पवार हे रविवारी त्यांची जीप (एम. एच. १०/ सी.आर. १२३०) सांगोलामार्गे मोडनिंबकडे घेऊन निघाले होते. सांगोल्यापासून पुढे तीन किलोमीटरवर फॅबटेक महाविद्यालयाजवळ आले असता पंढरपूरहून सांगोल्याच्या दिशेने निघालेल्या टेम्पो (एम. एच. २०/ सी.टी. ९१०५) ने जीपला समोरून जोराची धडक दिली. याचवेळी रस्त्यावरुन पायी चालत निघालेल्या चंद्रकांत ढेकळे यांना या वाहनांची धडक बसली आणि ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. त्यामुळे डोक्यास गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो वेगात असल्याने जीप चालक लक्ष्मण पवार व टेम्पो चालक मारुती केंद्रे दोघेही केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले.
यावेळी गस्तीवर निघालेले सहायक पोलीस निरीक्षक माने, तुकाराम व्हरे, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत सावंत, होमगार्ड गणेश झाडबुके यांनी अपघात पाहून जखमींच्या मदतीला धावले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघा चालकांना बाहेर काढले, मात्र जीप चालक लक्ष्मण पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. टेम्पो चालक लक्ष्मण केंद्रे याच्यावर सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत माणिक भालचंद्र बाबर (रा. मानेगाव, ता. सांगोला) यांनी टेम्पो चालक मारुती केंद्रे याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
-----
फोटो :०४ सांगोला अक्सीडेंट १ आणि २
सांगोला- पंढरपूर रोडवर टेम्पो व जीपची समोरासमोर धडक झाली.