सोलापूर : रंगभवन चौक आणि होम मैदान सुशोभिकरणाच्या कामाला विलंब लावणाºया दोन ठेकेदारांना सोलापूरस्मार्ट सिटी कॉर्पाेरेशन कंपनीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यात या ठेकेदारांना पावणेतीन लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत दर आठवड्याला कामाच्या शिल्लक रकमेवर ०.५ टक्क्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू राहील, अशी माहिती मनपा आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्मार्ट सिटी योजनेतून रंगभवन चौकात अर्बन प्लाझा विकसित करण्यात येत आहे. यासाठी ४ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद असून हे काम राजश्री कन्स्ट्रक्शन मुंबई ही कंपनी करीत आहे. जुलैअखेर काम पूर्ण करण्याची मुदत होती. ठेकेदाराने वेगवेगळी कारणे देऊन आॅगस्टअखेर काम पूर्ण होईल, असे सांगितले, परंतु कामाला विलंब होत राहिला. २ आॅक्टोबर रोजी ही तारीख देण्यात आली. तरीही काम पूर्ण न झाल्याने राजश्री कन्स्ट्रक्शनला जुलै ते आॅक्टोबर या दरम्यान सादर करण्यात आलेल्या बिलांमध्ये १ लाख ७५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.
होम मैदानाच्या सुशोभिकरणाचे काम निखिल कन्स्ट्रक्शन पुणे यांना मिळाले. यासाठी २ कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद आहे. आॅक्टोबरअखेर ही कामाची मुदत होती. होम मैदानाला लोखंडी कंपौंड, वॉकिंग ट्रॅक, हायमास्ट, पार्किंग व्यवस्था अशी कामे करण्यात येत आहे. हे कामही मुदतीत पूर्ण न झाल्याने निखिल कन्स्ट्रक्शनला १ लाख २२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. सध्या कंपौंडचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. हायमास्टही बसविण्यात आले आहेत. नोव्हेंबरअखेर काम पूर्ण करण्यात यावे, असे आदेश स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनने निखिल कन्स्ट्रक्शनला दिले आहेत, परंतु मुदतीत काम होईल याबद्दल साशंकता आहे.
मागील वर्षी गड्डायात्रेमुळे स्मार्ट रोडचे काम बंद ठेवण्यात आले होते. यानंतर ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. डिसेंबर २०१८ अखेर त्याने हे काम पूर्ण करायचे आहे. ते शक्यही आहे. त्याची क्षमता त्याने दाखवणे गरजेचे आहे. रंगभवन चौकाचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा शब्द देण्यात आला आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई सुरू राहील. -डॉ. अविनाश ढाकणे, सीईओ, सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोेरेशन.