सोलापूर : स्मार्ट रोड आणि हुतात्मा बागेतील कामांना विलंब लावल्याप्रकरणी सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन कंपनीने पुण्याच्या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शिल्लक कामातील बिलात पॉइंट पाच टक्के दंड आकारणी होणार आहे.
रंगभवन ते डफरीन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यादरम्यान स्मार्ट रोड तयार करण्यात येत आहे. या कामाची मुदत २२ डिसेंबरपर्यंत होती. सध्या रंगभवन चौक ते आपत्कालीन रस्ता खुला आहे. परंतु, काम पूर्ण झालेले नाही. डफरीन चौक ते डॉ. आंबेडकर पुतळा यादरम्यानचे एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. हरिभाई देवकरण प्रशालेजवळ भुयारी मार्गाचे काम अर्धवट आहे. गतवर्षी झालेल्या गड्डायात्रेदरम्यान हे काम दीड महिना बंद होते. यानंतर पाईपलाईनच्या कामांना विलंब लागला. त्यामुळे निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीने काम पूर्ण करण्यास मार्चपर्यंतची मुदत मागितली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र २२ डिसेंबरपासून बिलामागे दंडात्मक कारवाई सुरू झाल्याचे स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले. हुतात्मा बागेतील कामांची मुदत २० डिसेंबर रोजी संपली आहे. बागेमध्ये अॅडव्हेंचर पार्क, वॉकिंग ट्रॅक, रेस्टॉरंट आदी कामे करण्यात येत आहेत. सध्या बरीच कामे पूर्ण झालेली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
यापूर्वी होम मैदानाच्या कामात झाला दंड - निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे होम मैदानाच्या सुशोभीकरणाचे काम आहे. हे काम आॅक्टोबर महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. त्याला विलंब झाला. त्यामुळे निखिल कन्स्ट्रक्शनवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई झाली आहे.