सोलापूर : गणेश मंडळांनी रस्त्यावर मंडप मारताना परवान्यातील अटीचे पालन करणे आवश्यक आहे. पन्नास टक्क्यांपेक्षा जादा रस्ता मंडपासाठी अडविल्यास फौजदारी किंवा दंडाला मंडळाच्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयातर्फे गणेश मंडळांना ऑनलाइन परवाने देण्याची सोय करण्यात आली आहे. ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज केल्यावर मंडळाच्या जागेची पाहणी करून शहर वाहतूक शाखा ना हरकत प्रमाणपत्र दिल्यावर अध्यक्षाच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक जाणार आहे. या क्रमांकावरून मंडळाच्या अध्यक्षाला महापालिकेत जाऊन मंडपाचे शुल्क भरावे लागणार आहे. मंडपाच्या आकारावरून भूमी व मालमत्ता विभागातर्फे शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती भूमी व मालमत्ता विभागाच्या अधीक्षक सारिका आकुलवार यांनी दिली. महापालिकेत मंडपाचे शुल्क भरूनच मंडळांनी परवान्यात दिल्याप्रमाणे मंडपाची उभारणी करणे आवश्यक आहे.
पोलीस आयुक्तालयातर्फे मंडळांना परवाने वितरित केल्यानंतर प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती मंडपाची तपासणी करणार असल्याची माहिती नगरअभियंता संदीप कारंजे यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाहतुकीच्या मार्गावर मंडप मारताना ३0 व ७0 टक्क्यांप्रमाणे रचना करणे अपेक्षित आहे. रस्त्याच्या ३0 टक्के भागात मंडप तर ७0 टक्के रस्ता वाहतुकीला खुला असणे बंधनकारक आहे.
प्रांताधिकाºयांच्या अखत्यारीत असलेल्या या समितीमध्ये तहसीलदार, पोलीस आयुक्तालयातील अधिकारी, महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाचे अधीक्षक असे सदस्य राहणार आहेत. ही समिती रस्त्यावरील मंडपाची तपासणी करणार आहे. रस्त्यावर असलेल्या मंडपाचे छायाचित्र घेतले जाणार आहे. ज्या मंडळाने दिलेल्या परवान्याचे उल्लंघन केलेले असेल त्यांच्यावर फौजदारी किंवा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.